Paris Olympics 2024 : यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेच पॅरिसमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ही फ्रान्समध्ये आयोजित केलेली सर्वात मोठी स्पर्धा आहे. सध्या दररोज वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंच्या विविध खेळातील विजयाच्या बातम्या येत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेमधील खेळांबरोबरच खेळाशिवायच्या गोष्टीही चांगल्याच चर्चेत आहे. अशातच विजयानंतर एका खेळाडूचे सेलीब्रेशन त्याला चांगलेच महागात पडलं आहे. कांस्य पदक जिंकल्यानंतर खेळाडूने असा काही आनंद व्यक्त केला की त्याचे हाड मोडले.
सोमवारी पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात ज्युडो स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर मोल्दोव्हाच्या आदिल ओस्मानोव्हने इटलीच्या मॅन्युएल लोम्बार्डोवर विजय मिळवून त्याच्या पहिल्या ऑलिम्पिक पदकावर शिक्कामोर्तब केले. मात्र जिंकल्यानंतर उत्साही ओस्मानोव्हने आनंदात उजवा हात उंचावल्यामुळे त्याचा आनंद लवकरच वेदनांमध्ये बदलला.
मोल्दोव्हाचा ज्युडो खेळाडू आदिल ओस्मानोव्ह याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात त्याने इटलीच्या मॅन्युएल लोम्बार्डोचा पराभव करत आनंदाने उडी मारली. त्यानंतर तो आनंदाने ओरडला आणि गुडघे टेकून खाली बसला. या उडीमध्ये त्याचा खांदा निखळला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याने डाव्या हाताने दुखापतग्रस्त खांदा पकडला आणि इतर पदकविजेत्या खेळाडूंसोबत पदक घेण्यासाठी सहभागी झाला.
"पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि सामन्यापूर्वी मी आजारी होतो. हे खूप अवघड होते आणि सरावादरम्यान मला वाईट वाटले. पण माझ्यासोबत असे घडल्यानंतरही मला पदक मिळाले. माझ्याकडे सामन्यातून माघार घेण्याचा पर्याय नव्हता. मी माझे पदक दिवंगत वडिलांना समर्पित करतो. त्यांनी स्वतः ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्याचे स्वप्न पाहिले होते. पैशाअभावी ते यशस्वी होऊ शकले नाहीत. तेव्हा त्यांचे एक मूल ऑलिम्पिकमध्ये पोहोचेल आणि पदक जिंकेल, असे स्वप्न होते. आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे," अशा शब्दात आदिल ओस्मानोव्हने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पॅरिसमध्ये मिळालेल्या यशानंतर मोल्दोव्हनचे अध्यक्ष माईया सांडू यांनी ओस्मानोव्हचे अभिनंदन केले." मोल्दोव्हासाठी आणखी एक कांस्यपदक!ऑलिम्पिकमधील प्रभावी कामगिरीबद्दल आमच्या आदिल ओस्मानोव्हचे अभिनंदन. तुमचे यश हा आम्हा सर्वांचा विजय आहे," असे माईया सांडू यांनी म्हटलं.