पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक पटकावलं आहे. सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ट्रॅक अँड फील्ड खेळाडू ठरला आहे. यंदा पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. नदीमने ऑलिम्पिकमध्ये ९२.९७ मीटर भालाफेक करून नवा विक्रमही केला आहे. रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरजने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नीरजने एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला
"देशासाठी आपण जेव्हाही पदक जिंकतो, तेव्हा आनंद होतोच. रौप्य पदक जिंकलो, याचाही आनंद आहेच. मात्र सुवर्ण पदक हुकलं याचं दुख:ही मनात आहे. पण आता स्वत:मध्ये सुधारणा करण्याची वेळ आहे. याबाबत टीमसोबत बसून चर्चा करेन. माझ्या कामगिरीत आणखी सुधारणा करेन. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वच भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली आहे."
"टोकियो ऑलिम्पिकमध्यल्या पदकांची तुलना कोणीही या ऑलिम्पिमकमधल्या पदकांशी करू नये. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूने त्यांचा सर्वोत्तम खेळ केला आहे. प्रत्येक वेळी पदकांशी संख्या वाढेलच असं नाही. बदल होईलच असं नाही. पण येणाऱ्या काळात नक्कीच पदकांच्या संख्येत वाढ होईल" असा विश्वास नीरज चोप्राने व्यक्त केला आहे.
"देशवासियांना माझ्याकडून सुर्वणपदकाची अपेक्षा होती. याची मला जाणीव आहे. पण प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. मी माझ्याकडून सर्वोत्तम दिलं, पण यश मिळालं नाही. आज अर्शद नदीमचा दिवस होता. खेळात विजय-पराजय होत राहतात. येणाऱ्या काळात नक्कीच खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. आज आपलं राष्ट्रगीत वाजलं नाही. पण भविष्यात नक्कीचे ते ऐकू येईल. ते ठिकाण पॅरिस नसलं तरी दुसरी एखादी जागा असेल" असंही नीरज चोप्राने म्हटलं आहे.
"आमच्यासाठी रौप्य हे सुवर्ण पदकासमानच"; नीरज चोप्राच्या आईने व्यक्त केला आनंद
नीरज चोप्राच्या आई-वडिलांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. "ज्याने सुवर्ण पदक जिंकलं, तोही आमचाच मुलगा आहे" असं म्हटलं आहे. नीरज चोप्राची आई सरोज देवी म्हणाल्या की, "आम्ही खूप जास्त आनंदी आहोत, आमच्यासाठी रौप्य पदक हे सुवर्ण पदकासमानच आहे. ज्याने सुवर्ण पदक जिंकलं, तोही आमचाच मुलगा आहे. त्याने खूप मेहनत करून ते जिंकलं आहे. प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. तो जखमी झाला होता. त्यामुळे आम्ही त्याच्या कामगिरीवर खूश आहोत. जेव्हा नीरज घरी येईल तेव्हा त्याच्या आवडीचं जेवण बनवणार आहे."