Fayis Asraf Ali Support Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा यंदाच्या ऑलिम्पिकसाठी सज्ज आहे. भारताचा गोल्डन बॉय पॅरिसला पोहोचला आहे. मागील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकताच नीरज प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला... अनेक बड्या कंपनींनी जाहीरातीसाठी नीरजला आमंत्रण दिले. नीरज चोप्राचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तो सज्ज आहे.
नीरज चोप्राची पात्रता फेरी ६ ऑगस्टला होणार आहे. चोप्राला भेटण्यासाठी त्याचा एक जबरा फॅन पॅरिसच्या धरतीवर पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे तो चाहता विमानाने नाही तर नीरज चोप्राला भेटण्यासाठी चक्क सायकलवरून पॅरिसला पोहोचला आहे. फायिस असरफ अली असे या चाहत्याचे नाव आहे. नीरज चोप्राचा जबरा फॅन फायिस असरफ अलीने १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रवास सुरू केला आणि १७ देशांमधून पॅरिसला पोहोचण्यासाठी त्याला दोन वर्षे लागली. 'भारत ते लंडन सायकलिंग करून शांतता आणि एकतेचा संदेश देणे' हा त्याचा प्रमुख उद्देश होता. १ ऑगस्ट २०२३ रोजी त्याला जेव्हा कळले की नीरज चोप्रा देखील बुडापेस्टमध्ये राहत आहे. तेव्हा त्याने तिथे जाऊन भारताच्या गोल्डन बॉयची भेट घेतली.
फायिस असरफ अलीला नीरजने सल्ला दिला की, जर तू लंडनला जात असशील तर पॅरिसलाही ये... आणि तिथे ऑलिम्पिकचा आनंद घे. नीरजच्या या सल्ल्यानुसार अलीने आपला प्लॅन बदलला आणि पॅरिस ऑलिम्पिकला जाण्याची तयारी केली. त्याने व्हिसा मिळवला आणि नंतर तो ब्रिटनमधून पॅरिसला गेला. अलीने २ वर्षात २२ हजार किलोमीटरहून अधिक सायकल चालवली आणि ३० देश पार करून तो पॅरिसला पोहोचला.