Pakistan Athletes In Paris Olympic 2024 : शुक्रवारी भारतीय वेळेनुसार रात्री पॅरिस ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी पार पडली. ऑलिम्पिकचा उद्घाटन समारंभ पॅरिसमधील सीन नदीवर झाला, जिथे सहभागी देशांनी बोटीच्या माध्यमातून परेड केली. पाकिस्तानची तुकडीही या परेडचा एक भाग होती, परंतु त्याच दरम्यान लाईव्ह टीव्हीवरील एका समालोचकाने असे काही भाष्य केले ज्यावरून शेजाऱ्यांची खिल्ली उडवली जात आहे.
खरे तर पाकिस्तानची तुकडी सीन नदीवरून परेड काढत असताना समालोचकाने पाकिस्तानच्या परेडची माहिती दिली. यावेळी बोलताना तो भलतेच बोलून गेला. तो म्हणाला की, पाकिस्तानची लोकसंख्या २४ कोटी एवढी आहे. पण, ऑलिम्पिकमध्ये केवळ ७ ॲथलीट्स आले आहेत. पाकिस्तानची तुकडी १८ सदस्यांसह ऑलिम्पिकमध्ये पोहोचली आहे. १८ सदस्यांपैकी केवळ ७ ॲथलीट्स आहेत. इतर ११ अधिकारी आहेत. समालोचक थेट टीव्हीवर याबद्दल बोलल्याने शेजाऱ्यांची खिल्ली उडवली जात आहे. या समालोचकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाकिस्तानने १९५६ मध्ये सर्वप्रथम ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. त्यानंतर १९९२ मध्ये शेजाऱ्यांना पदक जिंकता आले. तेव्हापासून अद्याप त्यांच्या खात्यात पदकांचा दुष्काळ आहे. १९९२ मध्ये बर्सिलोना येथे खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा हॉकी संघ तिसऱ्या स्थानी राहिला आणि त्यांनी कांस्य पदक जिंकले.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधून भारताला चांगल्या पदकांची आशा असेल. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली होती. तेव्हा ११९ खेळाडू मैदानात होते. नीरज चोप्राच्या रूपात भारतात एकमेव सुवर्ण पदक आले. तर दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांनी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.