Kevin Piette Exoskeleton, Paris Olympics 2024: ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी अनेक प्रसिद्ध खेळाडू पॅरिसच्या रस्त्यावर ऑलिम्पिकची मशाल घेऊन धावताना दिसत आहेत. त्या खेळाडूंमध्ये केविन पीट याने फ्रेंच खेळाडूने ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वी वेगळाच इतिहास रचला. पाय निकामी असल्याने एखादा खेळाडू व्हिलचेअरच्या आधाराने हालचाल करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्येही सहभागी होतो, ही बाब नवीन नाही. पण समजा, तो खेळाडू अचानक उठून स्वत:च्या पायावर चालू लागला तर हा 'चमत्कार'च नाही का... पण विज्ञानाच्या मदतीने हा चमत्कार केविन पीटने करून दाखवला आणि पॅरिसच्या रस्त्यावर ऑलिम्पिकसाठी जमलेली सर्व जनता या इतिहासाची साक्षीदार झाली.
केविन पीट हा फ्रान्सचा दिव्यांग खेळाडू आहे. १० वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात त्याच्या पायातील चालण्याची शक्ती गेली. पण त्याने जिद्द सोडली नाही. चालण्याची शक्ती गेली असली तरी त्याची इच्छाशक्ती आणि धाडस संपलेले नव्हते. पॅरिसच्या रस्त्यावर केविन चक्क हातात ऑलिम्पिकची मशाल घेऊन स्वत:च्या पायावर चालताना दिसला. जग जसजसे विकसित होत आहे, तसतसे ते तंत्रज्ञानानेही सक्षम होत आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या 'टॉर्च मार्च'मध्ये केविन पीट याने तंत्रज्ञानाच्या मदतीने हा चमत्कार करून दाखवला. ऑलिम्पिक मशाल घेऊन चालण्यासाठी त्याने रोबोटिक एक्सोस्केलेटनचा वापर केला. केविन याआधीपासूनच हे तंत्रज्ञान वापरत आहे. पण ऑलिम्पिकच्या निमित्ताने संपूर्ण जगाने आज हा चमत्कार पाहिला.
केविन ऑलिम्पिकची मशाल घेऊन स्वत:च्या पायावर चालला, पाहा व्हिडीओ-
केविन पीट याने पॅरिस ऑलिम्पिकच्या टॉर्च रिलेमध्ये रोबोटिक एक्सोस्केलेटन ( Exoskeleton Robotics ) द्वारे धावून इतिहास रचला. वास्तविक, या तंत्रज्ञानाचा वापर करून धावणारा तो पहिला धावपटू ठरला आहे.