PM Modi congratulations call to Sarabjot Singh Manu Bhaker, Paris Olympics 2024: भारतीय तिरंदाजांची जोडी मनू भाकर आणि सरबजोत सिंग या दोघांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. भारताच्या मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत ओह ये जिन आणि ली वोंहो यांचा १६-१० असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. मनू भाकरने यंदा ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर आज मनूने सरबजोतसोबत मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळवले. सरबजोत सिंगचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी फोन करून त्याचे अभिनंदन केले.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सरबजोत सिंग याला फोन करून त्याचे कौतुक केले. या फोन कॉलचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरबजोत सिंग म्हणाले, "सरबजोतचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही देशासाठी मोठा नावलौकिक मिळवला आहे आणि देशाला मोठा सन्मानही मिळवून दिला आहे. तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे. मनू भाकेरचेही अभिनंदन. सिंगल्समध्ये तुला विजय मिळवता आला नाही, पण दुहेरीत तू यश मिळवलेस."
पंतप्रधान मोदींनी सरबजोतला विचारले की, तुमच्या आणि मनूच्या टीमने खूप चांगली कामगिरी केली. तुम्ही चांगले टीमवर्क दाखवले आहे, या यशामागचे रहस्य काय? याला उत्तर देताना सरबजोतने म्हणाला, "२०१९ पासून आम्ही प्रत्येक वेळी नॅशनलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पुढच्या वेळी ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक मिळवून दाखवू."
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.