भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने एका खास पत्राच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावरून तिने शेअर केलेले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात तिची चुलत बहिण आणि भारताची लोकप्रिय कुस्तीपटू गीता फोगाटची पोस्ट चर्चेत आली आहे. एका बाजूला विनेश फोगाटच्या पत्रातील एक एक मुद्दा लक्षवेधी ठरत असताना गीताला या पत्रातून एक महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित झाल्याची गोष्ट खटकली आहे.
विनेशनं दिलं पुन्हा कुस्तीच्या मैदानात उतरण्याचे संकेत
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाट हिने कुस्तीतून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. पण आता पत्रात तिने वेगवेगळ्या परिस्थितीत लढण्याची ताकत कायम ठेवून पुन्हा अगदी जोमानं आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत उतरण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे विनेश फोगाटने म्हटले आहे.
पण तिची एक गोष्ट बहिण गीताच्या मनाला चांगलीच लागली
विनेश फोगाटनं सोशल मीडियावरून जे पत्र शेअर केले आहे त्यातून तिने कुस्तीच्या प्रवासात साथ देणाऱ्यांचे खास आभार मानले आहेत. पण तिच्या पत्रात काका महावीर फोगाट यांचा उल्लेख दिसत नाही. हीच गोष्ट तिची बहिण आणि भारताची कुस्तीपटू गीता फोगाटच्या मनाला लागली आहे.
विनेशची ती पोस्ट बहिण गीता फोगाटला का खटकली?
विनेश फोगाटच्या खास पत्रावर वेगेवगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना गीता फोगाट हिचा पती पवन कुमार याने एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवलीये. ज्यात त्याने विनेश फोगाटनं पत्र खूपच सुंदर लिहिले आहे. पण कुस्तीचे धडे देणाऱ्या ताऊ जी महावीर फोगाट अर्थात काकांना विसरलीस, असा उल्लेख त्याने केलाय. देव तुला सुबुद्धी देवो, असा टोलाही त्याने मारल्याचे दिसते. नवऱ्याची ही पोस्ट रिट्विट करत गीताने बहिणीविरोधात दंड थोपटल्याचा सीन क्रिएट झाला आहे.
ऐतिहासिक कामगिरू करुनही मोकळ्या हाती परतण्याची वेळ
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाट ५० किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. भारताचे मेडल पक्के झाले असताना १०० ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे ती अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरली. त्यानंतर संयुक्त रौप्य पदकासाठीही तिने आखाड्याबाहेर लढाई लढली. पण इथंही क्रीडा लवादाने तिची याचिका फेटाळली होती. कुस्तीमध्ये फायनल गाठत तिने इतिहास रचला. पण या ऐतिहासिक कामगिरीनंतरही तिला मोकळ्या हातीच परतावे लागले.