Neeraj Chopra Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पदकविजेता नीरज चोप्रा आणि मनू भाकर प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अशातच मनू भाकरची आणि नीरज चोप्राचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मनूची आई नीरजचा हात डोक्यावर ठेवत असल्याचे दिसते. नेटकऱ्यांनी भलताच तर्क लावून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे मनू आणि नीरज एकमेकांशी बोलत असल्याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. आता नीरज आणि मनूची आई सुमेधा भाकर यांच्यात झालेल्या संवादाचा खुलासा करणारा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. (Neeraj Chopra Manu Bhaker News)
नीरज चोप्रा आणि मनू भाकर या दोन्ही खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. मनू भाकरने एकेरी आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. यासह एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू ठरली. दुसरीकडे, नीरज चोप्रा २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्ण पदकाचा बचाव करू शकला नाही, परंतु त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करून रौप्य पदक आपल्या नावावर केले.
मनू भाकरची आई नीरजला सांगते की, कोणताच तणाव घेणार नाही याची शपथ घे... थोडी विश्रांती घेऊन पुन्हा तयारी सुरू ठेवशील. बेटा, तुला त्रास होईल असे काही करू नकोस. मनूची आई नीरजला आणखी काही विचारते. पण, व्हिडीओमध्ये त्यांचा स्पष्ट संवाद ऐकू येत नाही.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली.