Paris Olympics 2024 Live Updates | पॅरिस : भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी १६ व्या राऊंडमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. महिलांच्या वैयक्तिक गटात दीपिकाचा सामना जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनशी झाला. पहिला सेट जिंकून या सामन्यात दीपिकाने ३-१ अशी आघाडी घेतली होती. पुन्हा मोठी आघाडी घेत दीपिकाने तिसरा सेटही जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये तिने २६-२५ असा विजय साकारला. अखेर दीपिकाने १६व्या फेरीत ६-४ असा विजय मिळवून पदकाच्या दिशेने कूच केली. या विजयासह दीपिका क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम आहे.
आपल्या १९ महिन्यांच्या लेकीला भारतात ठेवून पॅरिसला गेलेली दीपिका चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. दीपिका २०२२ मध्ये एका मुलीची आई झाली. ती अद्याप ऑलिम्पिकमधील तिच्या पहिल्या पदकाच्या शोधात आहे. मुलीपासून इतके दिवस लांब राहणे यामागे किती दु:ख लपले आहे हे शब्दांत मांडू शकत नाही. मी मागील अनेक वर्षांपासून ज्या पदकासाठी मेहनत करत आहे त्यासाठी हा त्याग आहे. मला मुलीची खूप आठवण येते, पण त्याला पर्यायही नाही, असे दीपिका सांगते.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.