paris olympics 2024 Updates In Marathi । पॅरिस : तिरंदाजीच्या उपांत्य फेरीत भारताने सुरुवातीलाच चांगली आघाडी घेतली. उपांत्य फेरीत भारताची लढत बलाढ्य कोरियासोबत झाली. पहिला सेट भारताच्या नावावर झाला अन् तमाम भारतीयांना सुखद धक्का बसला. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी पाच गुणांची आवश्यकता होती. पहिला सेट जिंकल्यामुळे भारतीय जोडीला दोन गुण मिळाले. पण, कोरियाने चांगला कमबॅक करत भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. या घडीला तीन गुणांची आघाडी कोरियाकडे होती. अखेर दुसरा सेट कोरियाने आपल्या नावावर केला.
तिसऱ्या सेटमध्येही कोरियन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पण, भारताच्या अंकितानेही चांगले पुनरागमन केले. परंतु, यावेळी धीरजला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. कोरियाकडे ४-२ अशी आघाडी होती. आघाडी कायम ठेवत कोरियाच्या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला. २-६ अशा फरकाने भारताला पराभव पत्करावा लागला. आता भारताचे शिलेदार दुसऱ्या उपांत्य फेरीत हरलेल्या संघाबरोबर कांस्य पदकासाठी लढतील. अमेरिका किंवा जर्मनीविरूद्ध भारताचा सामना होऊ शकतो. भारताच्या तिरंदाजी संघाने उपांत्य फेरीसाठीच्या लढतीत अप्रतिम कामगिरी करताना पदकाच्या दिशेने कूच केली. अंकिता आणि धीरज यांनी स्पेनच्या तिरंदाजांचा पराभव केला अन् उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत धडक मारून पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या, त्या अद्याप कायम आहेत. कारण उपांत्य फेरीत पराभव झाला असला तरी भारत कांस्य पदक जिंकू शकतो. स्पेनच्या जोडीला ५-३ ने असा पराभव करण्यात भारतीय शिलेदारांना यश आले.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.