Paris Olympics 2024 : भारताचाहॉकी संघ तब्बल ४४ वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवेल या आशेने तमाम भारतीय सामना पाहत होते. पण, जर्मनीच्या संघाने भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा करत अंतिम फेरी गाठली. पुन्हा एकदा भारतीय हॉकीचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. जर्मनीने उपांत्य फेरीत भारतीय संघाचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता कांस्य पदकाच्या लढतीत भारतीय संघाचा सामना स्पेनशी होणार आहे. भारतीय हॉकी संघाने शेवटच्या वेळी १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर ४१ वर्षांनंतर भारताला टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक मिळाले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. भारत उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत झाल्याने यावेळी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची लढत जर्मनी आणि नेदरलँड्स यांच्यात होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ म्हणावी तशी कामगिरी करू शकला नाही. अखेरच्या ६ मिनिटांत भारताच्या हातून सामना निसटला आणि भारत सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला. ५४व्या मिनिटाला जर्मनीने गोल करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पराभव होतात भारतीय शिलेदार भावुक झाले. भारतीय हॉकी संघ तब्बल ४४ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचू शकला असता. भारतीय हॉकी संघाचा इतिहास सुवर्णमय राहिला आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्ण पदके जिंकली आहेत. भारताने शेवटचे सुवर्ण पदक १९८० मध्ये जिंकले होते. यावेळी टीम इंडियाने ऑलिम्पिकमध्ये ही आशा जागवली होती. मात्र उपांत्य फेरीतपर्यंतच टीम इंडियाला समाधान मानावे लागले.
भारत कांस्य पदकासाठी खेळणार जर्मनीविरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने सुरुवातीला गोल करून १-० अशी आघाडी घेतली होती. भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने खाते उघडले होते. भारताचा विजयरथ कायम राहील असे अपेक्षित असताना जर्मनीने १८व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर २७व्या मिनिटाला गोल करत भारताने आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघ पुन्हा दडपणाखाली आला. संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारत अपयशी ठरला, त्यानंतर अखेर ५४व्या मिनिटाला जर्मनीने गोल करून भारताच्या आशा संपुष्टात आणल्या.
पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला की, सुवर्ण पदक जिंकण्याचे आमचे स्वप्न होते. पण आता ते भंगले आहे. आम्हाला भारतात रिकाम्या हाताने परतायचे नाही, त्यामुळे आम्ही कांस्य पदकाच्या सामन्यात आमचे सर्वोत्तम देऊ. भारतीय हॉकी संघ आता कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनशी खेळणार आहे. ३६ वर्षीय श्रीजेशचा हा शेवटचा सामना असेल. हा सामना जिंकून भारतीय खेळाडूंना श्रीजेशला अखेरचा निरोप द्यायचा आहे. ८ ऑगस्ट रोजी भारत आणि स्पेनचे संघ एकमेकांविरुद्ध कांस्य पदकासाठी सामना खेळणार आहेत.