Paris Olympics 2024 Updates In Marathi | पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'न भुतो' पराक्रम करून भारताची मान उंचावणारी मनू भाकर आज पुन्हा एकदा शूटिंग रेंजवर उतरली होती. २५ मीटर पिस्तूल प्रकारात अचूक निशाणा साधून पदकाची 'हॅटट्रिक' करण्याची नामी संधी तिच्याकडे होती. दोन कांस्य पदकांनंतर मनूने आता सुवर्णवेध घ्यावा, अशी देशवासीयांची इच्छा होती आणि त्यासाठी ते प्रार्थनाही करत होते. पण, तिसऱ्या पदकाने मनूला थोडक्यात हुलकावणी दिली. एकेक नेमबाज एलिमिनेट होत असताना, मनू सोबतच्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना काँटे की टक्कर देत होती. मात्र, तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पदकाची संधी हुकली खरी, पण मनूने देशवासीयांची मनं जिंकली, हे निश्चित!
भारताच्या २२ वर्षीय मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने आज पुन्हा एकदा अंतिम फेरी खेळली. या आधी तिने दोन कांस्य पदकांना गवसणी घातली होती. त्यात भर पडणार का, याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले होते. फायनलमध्ये बऱ्यापैकी युवा खेळाडू होते. अर्थात ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत असलेल्या शिलेदारांची संख्या मोठी होती. अंतिम फेरीत सुरुवातीला मनूने अचूक नेम धरत चांगली सुरुवात केली. या घडीला मनू भाकर दुसऱ्या क्रमांकावर स्थित होती.
मग पुढच्या काही शॉट्सनंतर मनू अडचणीत सापडली. तिच्यासमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे मोठे आव्हान होते. पण, तिने या कठीण परिस्थितीत अचूक नेम साधत एलिमेशनच्या धोक्यातून स्वत:ला बाहेर काढले. त्यामुळे मनू पदकाच्या शर्यतीत कायम होती. कोरियाची खेळाडू पहिल्या क्रमांकावर कायम होती. मनूने सातत्याने चांगले शॉट्स खेळल्याने तिने आणखी एक पदक निश्चित केले असे सर्वांना वाटू लागले. अखेरचे तीन शॉट्स राहिले असताना सामन्यात रंगत आली. मनूने पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, कोरियन खेळाडू वरचढ ठरल्याने मनूला अखेर पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले अन् ती चौथ्या क्रमांकावर राहिली.
फायनलमध्ये ग्रीन हाइटवर निशाणा साधणे गरजेचे असते. रेड लाइटवरचा निशाणा ग्राह्य धरला जात नाही अर्थात यामुळे संबंधित खेळाडूच्या गुणांमध्ये कमी होते. सुरुवातीला प्रत्येक नेमबाजाने तीन सिरीजमध्ये प्रत्येकी ५ शॉट्स खेळले. एकूण १५ शॉट्स खेळण्याची संधी मिळते. यानंतर प्रत्येक नेमबाजाने ५ शॉट्सची एक सिरीज खेळली. त्यानंतर सुवर्ण पदकाचा निकाल निश्चित होईपर्यंत एक-एक खेळाडू स्पर्धेतून बाहेर होत गेला.
...अन् तिसऱ्यांदा गाठली फायनलशुक्रवारी मनू भाकरने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली. तिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात फायनलमध्ये जागा मिळवून आणखी एका पदकाची आशा जिवंत ठेवली. मनूने एकूण ५९० गुणांसह दुसरे स्थान गाठून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मनू भाकरने प्रिसीजनमध्ये ९७, ९८ आणि ९९ असा स्कोअर केला. यामध्ये तिचा एकूण स्कोअर २९४ होता. तर, रॅपिड फायरमध्ये १००, ९८ आणि ९८ स्कोअर करण्यात तिने यश मिळवले. यामध्ये तिचा एकूण स्कोअर २९६ झाला अन् भारताची मनू तिसऱ्यांदा फायनल खेळण्यासाठी पात्र ठरली.
मनू भाकरची ऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरी
- २८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
- ३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.
- ३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.