Paris Olympics 2024 Updates In Marathi | पॅरिस : भारताच्या २२ वर्षीय मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने आज पुन्हा एकदा अंतिम फेरी खेळली. या आधी तिने दोन कांस्य पदकांना गवसणी घातली होती. त्यात भर पडणार का, याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले होते. फायनलमध्ये बऱ्यापैकी युवा खेळाडू होते. पण, अखेरच्या क्षणी मनू भाकरपासून पदक एक पाऊल दूर राहिले. कोरियाची खेळाडू पहिल्या क्रमांकावर कायम होती. मनूने सातत्याने चांगले शॉट्स खेळल्याने तिने आणखी एक पदक निश्चित केले असे सर्वांना वाटू लागले. अखेरचे तीन शॉट्स राहिले असताना सामन्यात रंगत आली. मनूने पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, कोरियन खेळाडू वरचढ ठरल्याने मनूला अखेर पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले अन् ती चौथ्या क्रमांकावर राहिली.
एक स्थानाने तिने झेप घेतली असती तर कांस्य पदकाची मानकरी ठरली असती. पण तोंडचा घास गेल्यानंतर ती भावुक झाली. मनू भाकरने सांगितले की, मी दोन कांस्य पदक जिंकू शकले याचा आनंद आहे. पण, आता मी चौथ्या स्थानी राहिली हे खूप वाईट आहे. फायनलमध्ये मी खूप नाराज होते. परंतु, मी माझ्या परीने प्रयत्न केला. मी शांत राहण्याचा आणि माझे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पुरेसे नव्हते. चौथे स्थान खूपच निराशाजनक असते. एकूणच केवळ एका पावलामुळे मनू भाकर पदकाला मुकल्याने ती भावुक झाली.
मनू भाकरची ऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरी
- २८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
- ३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.
- ३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.