Paris Olympics 2024 Updates In Marathi : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला आतापर्यंत केवळ तीन पदके जिंकता आली आहेत. या तीन कांस्य पदकांपैकी दोन पदके मनू भाकरने जिंकली. त्यामुळे मनू भाकर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. पॅरिसच्या धरतीवर तिरंगा फडकावणाऱ्या मनूचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मनू भाकरला तिच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल मोठे बक्षीस दिले. मनू भाकरने केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली.
मनू भाकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने ३० लाख रूपयांचे बक्षीस दिले आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची आज भेट घेतली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल खूप आभार. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी देशाचे खेळाडू आणखी उंच शिखरावर पोहोचतील अशी मला खात्री आहे, असे मनू भाकरने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले.
मनू भाकरची ऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरी
- २८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
- ३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.
- ३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.