vinesh phogat latest news : भारताची गोल्डन गर्ल म्हणून तमाम भारतीयांच्या मनात जागा मिळवणारी विनेश फोगाट शनिवारी मायदेशात परतली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अंतिम फेरी गाठूनही विनेश पदकाला मुकली. १०० ग्रॅम वजन वाढल्याने भारताच्या हक्काचे पदक गेले. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले पण तिथेही विनेशच्या हाती निराशा पडली. भारतात परतताच विनेशला अश्रू अनावर झाले. तिच्या सहकारी खेळाडूंनी दिल्ली विमानतळावर तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिक फायनलपूर्वी अपात्र ठरविण्याविरुद्ध केलेले अपील बुधवारी फेटाळले अन् या निर्णयाने विनेशसह सर्व भारतीयांची मोठी निराशा झाली.
ऑलिम्पिक गाजवणाऱ्या विनेशचे स्वागत करण्यासाठी कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी आवर्जुन हजेरी लावली. भला मोठा ताफा आणि माध्यमांचा गराडा हे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. "आजचा दिवस खूप मोठा आहे. विनेश फोगाटने आपल्या देशासाठी केलेली कामगिरी अप्रतिम आहे. तिचे आज ज्या पद्धतीने स्वागत झाले. ते भविष्यातही होईल अशी मला खात्री आहे", असे साक्षी मलिकने सांगितले. तर बजरंग पुनिया म्हणाला की, विनेशचे स्वागत एखाद्या चॅम्पियनप्रमाणे झाले. संपूर्ण देश तिच्या यशाचा साक्षीदार आहे, त्या सर्वांचे खूप आभार.
भला मोठा ताफा पाहून विनेश भारावली. माझे एवढ्या उत्साहात स्वागत केल्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्या देशवासीयांकडून मला मिळालेले हे प्रेम आणि आदराबद्दल मी कृतज्ञ आहे, असे विनेशने नमूद केले.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली.