paris olympics 2024 updates : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत भारताने यावेळी एक पदक कमी जिंकले. याशिवाय यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एकाही शिलेदाराला सुवर्ण पदकाला गवसणी घालता आली नाही. अखेर एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले. लोकसंख्येच्या बाबतीत जगात अव्वल असणाऱ्या देशाने केवळ सहा पदके जिंकली. याचा दाखला देत अनेकांनी खदखद व्यक्त केली. अशातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
मला अर्थातच पॅरिस ऑलिम्पिकमधील आमच्या शूर पदकविजेत्यांचा खूप अभिमान आहे. पण पदकतालिकेतील आमची एकूण क्रमवारीतील घसरण पाहून मला दुःखाची कबुली द्यावीच लागेल. आपल्या क्षमतेनुसार जगण्यासाठी आणि आपल्या लोकसंख्येनुसार पदक मिळवण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल प्रत्येकजण विचार करत असतो. पण, माझे विचार संपले आहेत आणि मी गोंधळलो आहे. सरकारने खेळाडूंसाठी चांगला पैसाही खर्च केला. जिंकलेल्या खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून खूप प्रोत्साहन दिले गेले. क्रीडा पायाभूत सुविधांची गुणवत्ता सुधारते आहे, असे आनंद महिंद्रा यांनी सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपले मत मांडले.
तसेच शाळांनी खेळावर अधिक भर दिला आहे. देशाची मानसिकता देखील बदलली आहे. सर्वांना आमच्या खेळाडूंमध्ये खूप रस आहे आणि आम्ही ते उत्साहाने साजरेही करतो आहे. मग पृथ्वीवर असे काय आहे, ज्यामुळे आपल्याला ऑलिम्पिक खेळांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप पाडता येत नाही? अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली.