Paris Olympic 2024 Updates In Marathi : भारताच्या लक्ष्य सेनने जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लिश खेळाडूचा पराभव केला. जोनाथन क्रिस्टीचा पराभव करत भारताच्या खेळाडूने 'लक्ष्य' गाठलेच. लक्ष्य सेनने आता बाद फेरी गाठली आहे. लक्ष्य सेनने २-० ने विजय मिळवला अन् सामना अविस्मरनीय केला. त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठून तमाम भारतीयांना सुखद धक्का दिला. पहिल्या गेममध्ये लक्ष्यने प्रतिस्पर्धी खेळाडूचा २१-१८ असा पराभव केला. अवघ्या २८ मिनिटांत गेम जिंकण्यात त्याला यश आले. लक्ष्य जागतिक क्रमवारीत एकोणिसाव्या स्थानावर आहे.
लक्ष्य सेनसाठी आजचा सामना 'करा किंवा मरा' असा होता. लक्ष्यची आजची खेळी पाहून त्याच्यासाठी एकच म्हणावे लागेल की, त्याला तोडच नाय... अभेद्य बचाव, आक्रमकता आणि चतुराने त्याने सर्वांना प्रभावित केले. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या लक्ष्यने जोरदार कमबॅक केला. २-८ आणि नंतर १६-१८ अशा पिछाडीवर असलेल्या लक्ष्यने जोरदार पुनरागमन करत सर्वांचे लक्ष वेधले. अखेर २१-१८ अशा फरकाने बाजी मारण्यात त्याला यश आले. एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे लक्ष्य सेनने एक अद्भुत शॉट खेळला. पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यचा दबदबा पाहायला मिळाला.
या विजयासह भारताच्या लक्ष्यने आता उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. खरे तर हा सामना गट साखळीमधील असला तरी लक्ष्यसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. आजचा पराभव त्याला स्पर्धेबाहेर घेऊन गेला असता. त्यामुळे लक्ष्य सेनच्या खेळीचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
भारतीय शिलेदारांची आजची कामगिरी
- पीव्ही सिंधूचा सलग दुसरा विजय
- लक्ष्य सेनचा 'करा किंवा मरा'च्या सामन्यात विजय
- वाढदिवशी श्रीजा अकुलाने देशवासियांना दिली विजयाची भेट
- महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेचा अंतिम फेरीत प्रवेश
लक्ष्य सेनचा अभेद्य बचाव