vinesh phogat news : विनेश फोगाटच्या तोंडचा घास गेल्याने ती बेशुद्ध झाली. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने मंगळवारी महिलांच्या कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठत इतिहास रचला. तसेच देशासाठी बहुमूल्य असे एक ऑलिम्पिक पदक निश्चित केले. मात्र बुधवारी वजनी गटाच्या मर्यादेपेक्षा किंचीत अधिक वजन आढळल्याने विनेशला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आले. या निर्णयामुळे विनेशचे हातातोंडाशी आलेले पदक हुकले असून, त्याचा मोठा धक्का विनेशला बसला. दरम्यान, बेशुद्ध झाल्याने विनेश फोगाट हिला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांनी रूग्णालयात जाऊन विनेशच्या तब्येतीची विचारपूस केली.
विनेश फोगाटच्या अपात्रतेबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा म्हणाल्या की, आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. मी जागतिक कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनाही भेटणार आहे.
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ५० किलो वजनी गटामध्ये भारताच्या विनेश फोगाट हिने मंगळवारी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत मुसंडी मारली होती. सलामीच्या सामन्यात विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी करताना जपानची दिग्गज खेळाडू सुसाकी विरूद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर विनेशने उपांत्यपूर्व सामन्यात सामन्यात युक्रेनची प्रतिस्पर्धी ओक्साना लिवाच हिचा पराभव केला. तर उपांत्य सामन्यात विनेशने क्यूबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुजमैनला ५-० ने दारुण पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. अंतिम सामन्यात विनेशची गाठ अमेरिकन महिला कुस्तीपटू एस. हिल्डब्रांट्स हिच्याविरुद्द होणार होता. मात्र तत्पूर्वीच तिला अपात्र ठरवण्यात आले.
दरम्यान, विनेश फोगाटच्या रूपात भारताला आणखी एक पदक मिळणार हे निश्चित झाले होते. पण, बुधवारी कोणालाच विश्वास न बसणारी बातमी समोर आली अन् एकच खळबळ माजली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.