paris olympics 2024 Updates In Marathi । पॅरिस : तिरंदाजीमध्ये कांस्य पदकाच्या लढतीत भारतासमोर अमेरिकेचे आव्हान होते. उपांत्य फेरीत भारताची जोडी कोरियाकडून पराभूत झाल्याने त्यांना कांस्य पदकासाठी लढावे लागले. कांस्य पदकाच्या सामन्यात भारत पहिल्या दोन सेटमध्ये भारत ०-४ अशा फरकाने पिछाडीवर होता. पण, अंकिताने अचूक नेम धरत जोरदार कमबॅक केला. मग धीरजनेही कमाल करून तिसरा सेट भारताच्या नावावर केला. भारताचे तिरंदाज धीरज बोम्मदेवरा आणि अंकिता भकत यांनी कडवी झुंज देत अखेरपर्यंत पदकाची आशा कायम ठेवली पण त्यांना पदक जिंकण्यात अपयश आले.
चौथ्या सेटमध्ये भारताकडून अंकिताने म्हणावी तशी कामगिरी केली नाही. तीन ऑलिम्पिक पदकविजेत्या अमेरिकेन शिलेदाराने पुन्हा एकदा अचूक नेम धरून पदकाच्या दिशेने कूच केली आणि जवळपास पदक निश्चित केले. पण, धीरजने त्याचे काम चोखपणे पार पाडले. अखेर अमेरिकेने तिरंदाजीच्या मिश्र गटात ६-१ ने भारताचा पराभव केला. कांस्य पदकाच्या लढतीत अमेरिकेने भारताचा पराभव करून कांस्य पदकाला गवसणी घातली.
कांस्य पदकाच्या सामन्यातील भारतीय जोडीची कामगिरीधीरज - १०, १०, १०, ९, ९, १०, ९, १०अंकिता - ७, १०, ७, ९, १०, ९, ८, ८
दरम्यान, भारताच्या तिरंदाजी संघाने उपांत्य फेरीसाठीच्या लढतीत अप्रतिम कामगिरी करताना पदकाच्या दिशेने कूच केली. अंकिता आणि धीरज यांनी स्पेनच्या तिरंदाजांचा पराभव केला अन् उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत धडक मारून पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण, भारत उपांत्य फेरीत कोरियाच्या शिलेदारांकडून पराभूत झाला. त्यामुळे कांस्य पदकासाठी अमेरिका आणि भारत यांच्यात सामना झाला.