Paris Olympics 2024: भारतीय प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) इतिहास रचला आहे. विनेश फोगाटनं फायनलमध्ये एन्ट्री घेत भारतासाठी आणखी एक मेडल पक्कं केले आहे. मंगळवारी महिला मॅटवरच्या कुस्तीत ५० किग्रॅ वजनी गटात फ्रीस्टाईल इव्हेंटमध्ये सेमीफायनलमध्ये क्यूबाची रेसलर युसनेइलिस गुजमैनला ५-० नं दारुण पराभव केला. आता विनेशची फायनल बुधवारी (७ ऑगस्ट) होणार आहे.
ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली आहे. विनेश फोगाटच्या फायनलमधील एन्ट्रीनं तिच्याकडे गोल्ड मेडल जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
३ मिनिटांच्या पहिल्या फेरीत विनेशनं १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने चांगली टेकडाउन करत आणखी ४ गुण मिळवले. संपूर्ण सामन्यादरम्यान भारतीय कुस्तीपटूचे बचावात्मक कौशल्य पाहण्यासारखे होते. केवळ बचावात्मक खेळ न दाखवता काऊंटर अटॅक करून विनेशनं मॅचमध्ये वर्चस्व राखले आणि शेवटी ५-० असा विजय मिळवला. विनेशची आता अंतिम लढतीत अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी सामना होईल, जिनं २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.
मागील वर्षी विनेश फोगाटनं भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप करत दिर्घकाळ चाललेल्या आंदोलनाचं नेतृत्व केले होते. त्यामुळे खूप काळ ती मॅटपासून दूर होती. मात्र ऑलिम्पिकमध्ये येताच विनेश फोगाट यांनी जबरदस्त यश मिळवलं आहे. विनेशनं पहिल्यांदाच कुस्तीत ५० किग्रॅ वजनी गटात आव्हान दिलं होतं. त्याआधी ती ५३ किमी वजनी गटात खेळत होती.
कॉमनवेल्थमध्ये ३ गोल्ड मेडलची मानकरी
विनेश फोगाटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग ३ गोल्ड मेडल जिंकले होते. २०१४ ग्लास्गो, २०१८ कोस्ट आणि २०२२ बर्मिंघम येथील स्पर्धेत गोल्ड पदक जिंकले होते. त्याशिवाय विनेशनं २०१८ मध्ये जकार्ता येथील एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर नाव कोरलं होतं. एशियन चॅम्पियनशिप २०२१ मध्येही विनेश फोगाटनं गोल्ड जिंकत सुवर्ण कामगिरी केली. त्याशिवाय एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने ३ सिल्व्हर मेडलही जिंकले आहे.