पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची सुरुवात चांगली झाली. टोकिया ऑलिम्पिक प्रमाणे यावेळीही दुसऱ्या दिवशीच पदकाचे खाते उघडले. पण नेमबाजीतील 3 पदकं सोडली तर अन्य खेळात अनेक खेळाडूंच्या पदरी निराशाच आली. पण स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असताना आता सुवर्ण पदकाची आस दिसू लागली आहे.
पॅरिसमध्ये पुन्हा नव्या पराक्रमाची आस
नीरज चोप्रा मैदानात उतरणार असला की, "गो फॉर गोल्ड..." ही ओळ आपसूक ओठांवर येते. कारण सातत्याने त्याने ही गोष्ट करून दाखवली आहे. परिसस्पर्शानं लोखंडाचे सोनं होते, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अगदी त्याप्रमाणेच नीरज चोप्राच्या हातातही जादू आहे. त्याचा स्पर्श झाला की, भाला जणू अशा ठिकाणी जाऊन पडतो. की, सुवर्ण अक्षराने नवा इतिहास लिहिला जातो. हीच गोष्ट पॅरिसमध्ये पुन्हा पाहायला मिळेल, अशी आस आहे.
90 + मीटर अंतर भाला फेकण्यावर फोकस
नीरज चोप्रानं फायनलसाठी पात्रता सिद्ध करताना सर्वात लांब अंतरावर भाला फेकून पुन्हा ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. पण तुम्हाला पटणार नाही. नीरज चोप्रासोबत फायनलमध्ये असणारे काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी नीरज चोप्रापेक्षा लांब अंतर भाला फेकण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे. नीरज चोप्रा मागील ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सातत्याने 90 मीटर चे टार्गेट सेट करून सराव करतोय. तो त्या टार्गेटच्या जवळही पोहचलाय. पण फायनलमध्ये पाच खेळाडू आहेत ज्यांचा बेस्ट पर्सनल थ्रो हा 90+ मीटर आहे.
नीरजसोबत स्पर्धेत असणारे 5 खेळाडू अन् त्यांचा पर्सनल बेस्ट थ्रोचा रेकॉर्ड
यात वर्ल्ड रँकिंगमध्ये नंबर वन असणारा चेक प्रजासत्ताकचा जाकुब (90.88 मीटर), जर्मनीचा पीटर अँडरसन (93.07), त्रिनिदादियन आणि टोबॅगोनियनचा केशॉर्न वॉलकॉट (90.16), पाकचा नदीम अर्शद (90.18) आणि केनियाचा येगो जुलीएस (92.72) अशी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. या पाच खेळाडूंनी 90 + मीटर अंतर भाला फेकण्याची क्षमता दाखवून दिली आहे. पण तरीही 90 मीटरच्या उंबरठ्यावर असणारा नीरज चोप्रा यांच्यापेक्षा भारी ठरतो.
या कारणामुळे नीरज चोप्रा ठरतो 'गोल्ड'चा प्रबळ दावेदार
पुरुष भालाफेक क्रीडा प्रकारात अंतिम 12 पैकी 5 खेळाडू हे 90 + मीटर पर्सनल बेस्टसह मैदानात उतरणार असले तरी हंगामातील त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. हीच गोष्ट नीरजला त्यांच्यापेक्षा भारी ठरवते. नीरज चोप्राचा पर्सनल बेस्ट थ्रो 89.94 मीटर इतका आहे. हंगामातील सर्वोत्तम 89.34 मीटरसह तो फायनलसाठी पात्र ठरला आहे. इतर स्पर्धकांच्या तुलनेत तो खूप पुढे आहे. गत चॅम्पियन असल्यामुळे मोठ्या आत्मविश्वासासह मैदानात उतरत तो 90 + चा आकडा यावेळी सहज पार करेल, असे वाटते. ही गोष्ट त्याला गोल्डचा प्रबळ दावेदार ठरवते.