बंगळुरू - ‘सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकल्याचा केलेला जल्लोष हा भूतकाळ झाला आहे. आता चीनमध्ये या महिन्यात होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये विजेतेपदाचे लक्ष्य आहे,’ असे भारतीय पुरुष हाॅकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने म्हटले.
हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. हरमनप्रीतने आता विश्रांतीनंतर ८ ते १७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्राॅफीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. हरमनप्रीतने चीनला रवाना होण्यापूर्वी सांगितले की, ‘पॅरिस ऑलिम्पिकनंतर विश्रांती घेतल्यानंतर भारतीय संघ आशियाई संघांचा सामना करण्यास सज्ज आहे. पॅरिसमध्ये आमची कामगिरी चांगली राहिली; पण हाॅकी अतिशय अटीतटीचा खेळ आहे. आम्ही भूतकाळातील चांगल्या कामगिरीवर अवलंबून राहू शकत नाही.’
१४ सप्टेंबरला पाकविरुद्ध लढत भारतासह कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि यजमान चीन या स्पर्धेत सहभागी आहेत. भारताला ८ सप्टेंबरला चीनविरुद्ध खेळायचे आहे. त्यानंतर ९ सप्टेंबरला जपान, ११ सप्टेंबरला मलेशिया, १२ सप्टेंबरला कोरिया आणि १४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध लढत द्यायची आहे. अव्वल चार संघ उपांत्य फेरीत खेळतील. अंतिम लढत १७ सप्टेंबरला होणार आहे. भारताने चारवेळी, पाकिस्तानने तीनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मागील स्पर्धेत चेन्नई येथे भारताने मलेशियाला ४-३ असे नमवून विजेतेपद पटकावले होते.