Paris Olympics Gold Medalist An Se-young Exposes Long-term Bullying: ऑलिम्पिकमध्ये एखाद्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले तर चाहते त्याचे कौतुक करतात. त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होतो. टीमचे खेळाडू त्या वक्तीचे अभिनंदन करतात. पण दक्षिण कोरियाची स्टार बॅडमिंटनपटू अन से-यंग सोबत काही वेगळे आणि घृणास्पद घडले. अन से-यंगने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले, मात्र तिच्या संघातील ( South Korean Badminton Team ) वरिष्ठ खेळाडूंनी तिचा छळ केल्याचा धक्कादायक खुलासा दक्षिण कोरियाच्या मीडियाने केला आहे. से-यंगला केवळ शिवीगाळच नाही तर मारहाणही करण्यात आली. तसेच वरिष्ठ पुरुष खेळाडूंची अंतर्वस्त्रेही धुवायला लावले होते.
से-यंगचा छळ, वरिष्ठ खेळाडूंकडून त्रास
दक्षिण कोरियाच्या संसदेने केलेल्या तपासात असे दिसून आले की बॅडमिंटन राष्ट्रीय संघाने तिच्यावर प्रचंड अत्याचार केले. हे सर्वकाही बरेच दिवस चालले होते. तपासात असा दावा करण्यात आला आहे की, सुवर्णपदक विजेती अन से-यंग हिला इतर वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे कपडे धुवायला लावले जात होते. काही पुरुष खेळाडूंनी तिला आपली अंतर्वस्त्रेही धुवायला लावली. से-यंग हिने त्याचवेळी याबाबत तक्रार केली होती पण दक्षिण कोरियाच्या बॅडमिंटन संघटनेने याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.
से-यंग हिने केलेत गंभीर आरोप
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर अन से-यंगने सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितले की, गेल्या ७ वर्षांपासून तिच्याच टीमचे सदस्य तिला कसे त्रास देत आहेत. तिने कोरिया बॅडमिंटन संघटनेवर जोरदार टीका केली. अन से-यंगच्या सोशल मीडिया पोस्टनंतरच या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. आता दोषींवर कठोर कारवाई होऊ शकते.
अन से-यंगची कारकीर्द
से-यंग ही दक्षिण कोरियाची युवा बॅडमिंटनपटू आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले पहिले सुवर्णपदक जिंकले. याशिवाय अन से-यंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत २ वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि उबर कपमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे.