पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी दिवसभरात भारतीय खेळाडूंना अपेक्षित कामगिरी बजावता आली नाही. पण रात्री उशीरा सुरु झालेल्या मैदानी खेळात भारतीय खेळाडूंनी दिमाखदार कामगिरीसह ५ पदकं भारताच्या खात्यात जमा केली. या पदकासह भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक पदकं कमावण्याचा विक्रम रचला आहे.
पॅरालिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात घडलं नाही ते चित्र पाहायला मिळालं
पॅरालिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक १९ पदकांची कमाई केली होती. आता सातव्या दिवसाच्या सुरुवातीआधी भारताच्या खात्यात २० पदकं जमा आहेत.
सहाव्या दिवशी रात्री उशीरा मैदानी खेळातून आली ५ पदकं
सहाव्या दिवशी मैदानी खेळातून दीप्ती जीवनजी हिने कांस्य पदकासह भारताच्या पदकाची सुरुवात केली होती. त्यानंतर उंच उडी आणि भालाफेक प्रकारात प्रत्येकी दोन-दोन पदकं भारताच्या खात्यात जमा झाली. सहाव्या दिवशी रात्री उशीरा कमावलेल्या ५ पदकासह पॅरालिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक पदकं मिळवण्याचा महा विक्रम भारताच्या नावे झाला आहे.
भालाफेक F46 प्रकारातही दोघांची पदकाला गवसणी
उंच उडीशिवाय भालाफेक F46 प्रकारात अजीत सिंह याने ६५.६२ मीटर अंतरावर भाला फेकून रौप्य पदकावर कब्जा केला. दुसरीकडे याच गटात सुंदरसिंह गुर्जर याने ६४.९६ मीटर भालाफेकीसह कांस्य पदक पटकावले. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य पदकांसह एकूण २० पदकांची कमाई केली आहे. हा आकडा सरशेवटी आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. पदकतालिकेत भारत १७ व्या स्थानावर आहे.