पॅरिस - तिरंदाज हरविंदर सिंग याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना पुरुष खुल्या रिकर्व्ह गटात सुवर्णपदक पटकावले. हरविंदरने सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावले असून तो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीयही ठरला आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत हरविंदरने पोलंडच्या लुकास्झ सिस्झेक याचा ६-० असा फडशा पाडला.
हरविंदरने याआधी उपांत्य फेरीत इराणच्या मोहम्मद रेझा अरब अमेरी याचे कडवे आव्हान ७-३ असे परतवले होते. ही लढत जिंकून हरविंदर पॅरालिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला भारतीय तिरंदाज बनला होता. अंतिम सामन्यात हरविंदरने धडाकेबाज खेळ करताना सुरुवातीपासून सामन्यावर घट्ट पकड मिळवली आणि लुकास्झ याला २८-२४, २८-२७, २९-२५ असे नमवले. विशेष म्हणजे हरविंदरने सलग पाच सामने जिंकत दिमाखात सुवर्ण पटकावले. रिकर्व्ह गटात प्रत्येक तिरंदाज ७० मीटर अंतरावरून नेम साधतात.
हरविंदर दीड वर्षाचा असताना त्याला डेंग्यू झाला होता. यावर उपचार सुरू असताना देण्यात आलेल्या इंजेक्शनने हरविंदरच्या पायांवर नकारात्मक परिणाम झाला. यामुळे त्याच्या पायांच्या हालचालींमध्ये अडचणी आल्या. हरविंदरने तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. पॅरालिम्पिकमध्ये तो पदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज ठरला होता.