पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात जमा झालेल्या रौप्यचं काही मिनिटांत सुवर्ण पदकात रुपांतर झाले. भारतीय पॅरालिम्पियन आणि भालाफेकपटू नवदीप सिंग (Navdeep Singh )पुरुष गटातील F41 प्रकारात ४७.३२ मीटर अंतरावर भाला फेकत दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. पण इराणचा सदेह बेइत सयाह (Sadegh Beit Sayah)अपात्र ठरल्यामुळे भारताचा नवदीपला पॅरिसमध्ये गोल्डन बॉयचा मान मिळाला.
इराणी खेळाडूनं लांब भाला फेकला, पण या कारणामुळे त्याचा प्रयत्न निर्थक ठरला
भारताच्या नवदीपनं ४७.३२ मीटर पॅरालिम्पिक रेकॉर्ड मोडीत काढला होता. पण इराणच्या सदेह बेइत सयाह याने ४७.६४ मीटर अंतरावर भाला फेकून त्याला मागे टाकले. पण पंचांकडून त्याला दोन येलो कार्ड मिळाल्यामुळे तो शेवटी अपात्र ठरला. परिणामी त्याने जे काही प्रयत्न केले होते ते शून्य ठरले. आणि भारताच्या पदकाचा रंग बदलला. नवदीपला गोल्ड मिळाले.
सातव्या 'गोल्ड'सह भारत कितव्या स्थानावर?
नवदीपचं रौप्य सुवर्ण पदकामध्ये बदलल्यामुळे भारताच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य अशा एकूण २९ पदकासह भारत पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदकतालिकेत १६ व्या स्थानावर पोहचला आहे.
भारताचा दिवस सोनेरी झाला; पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडलेलाही पोडियमवर दिसला
पुरुष गटातील F41 प्रकारात नवदीप पाठोपाठ चीनचा सुन पेंगझियांग हा दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने ४२.७२ मीटर अंतरावर भाला फेकल्याचे पाहायला मिळाले. अंतिम फेरीत ४०.४६ मीटर अंतर भाला फेकल्यामुळे पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या इराकच्या विल्डन नुखाइलावी यालाही पोडियमवर येण्याची संधी मिळाली. चौथ्या स्थानावरुन तो तिसऱ्या स्थानावर विराजमान होत कांस्य पदकाचा दावेदार झाला.