Paris Paralympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला केवळ सहा पदके जिंकता आली. यामध्ये एकाही सुवर्ण पदकाचा समावेश नव्हता. मात्र, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी सुवर्ण पदक जिंकता आले. अवनी लेखरा हिने सोनेरी कामगिरी करत तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल एकेरीत सुवर्ण पदक पटकावले अन् अवनी देशाच्या अपेक्षांवर खरी उतरली.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी एका सुवर्ण पदकासह दोन पदके जिंकणारी नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी आणखी एक सुवर्ण पदक जिंकून कमाल केली. तिने स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी १० मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले. अशा प्रकारे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने शानदार सुरुवात केली आहे. याशिवाय भारताच्या मोना अग्रवालने याच स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.
दरम्यान, मागील ऑलिम्पिकमधील आपलाच विक्रम मोडण्यात अवनीला यश आले. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये २४९.६ च्या स्कोअरने पॅरालिम्पिकमध्ये विक्रम बनवला होता. यावेळी तिने २४९.७ स्कोअर केला आणि तिचाच पॅरालिम्पिकमधील विक्रम मोडला. तर, भारताच्या मोना अग्रवालने २२८.७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आणि तिला कांस्य पदक मिळाले. दक्षिण कोरियाच्या युनरी लीने २४६.८ गुण मिळवत रौप्य पदक पटकावले.
अवनी गोल्ड जिंकली तो क्षण
सुवर्ण पदकासाठी काही वेळ भारताच्या दोन खेळाडूंमध्ये चुरस झाली. मोना अग्रवाल काही वेळ अव्वल स्थानी राहिली. पण यानंतर कोरियन नेमबाजने पहिला क्रमांक पटकावला. मग अवनी तिसऱ्या क्रमांकावर घसरली होती. मात्र, तिने जबरदस्त पुनरागमन केले. भारताच्या मोनाचा प्रवास २२ शॉट्सनंतर तिसऱ्या क्रमांकावर संपला. २४व्या आणि शेवटच्या शॉटमध्ये अवनीने १०.५, तर दक्षिण कोरियाच्या युनरीने ६.८ असा स्कोअर केला. अशा प्रकारे अवनीने सुवर्ण पदक जिंकले.