भारताची वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियन दीप्ती जीवनजी हिने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. स्पर्धेतील सहाव्या दिवस संपता संपता तिने 400m T20 प्रकारातील धावण्याची शर्यत अवघ्या ५५.८२ सेकंदात जिंकत कांस्य पदकाची कमाई केली आहे. या पदकासह भारताच्या खात्यात १६ व्या पदकांची नोंद झाली आहे.
सुवर्ण अन् कांस्य पदक विजेत्यात सेकंदाच्या काही भागाचा फरक
युक्रेनच्या वाय. शुलियार हिने ५५.१६ सेकंदात ही शर्यत पार करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिच्या पाठोपाठ तुर्कस्तानची ए. ऑन्डर ५५.२३ सेकंदासह दुसऱ्या क्रमांकावर होती. तिने रौप्य पदक पटकावले. सुवर्ण पदक विजेत्या शुलियार आणि भारताची कांस्य पदक विजेती दीप्ती यांच्यातील फरक फक्त ०.१६४ सेकंद इतका होता. दीप्तीचं सुवर्ण सेकंदाच्या काही भागामुळे हुकले, असे म्हणता येईल.
दीप्तीनं पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत केली होती वर्ल्ड रेकॉर्डची नोंद
पॅरालिम्पिक स्पर्धेतील धावण्याच्या शर्यतीतील टी-२० हा प्रकार बौद्धिक पातळी कमकवूत असणाऱ्या खेळाडूंसाठी आहे. दीप्तीन याआधी हांगझोऊ येथील पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर टी-२० धावण्याच्या शर्यातीत ५६.६९ सेकंदासह सुवर्ण पदक जिंकले होते. तो त्यावेळीचा या प्रकारातील शर्यतीतील वर्ल्ड रेकॉर्ड होता.
सक्षम असणाऱ्या खेळाडूंना चॅलेंज देणारी छोरी
दीप्ती ही बौद्धिकरित्या असक्षम असणाऱ्या गटात मोडणारी खेळाडू असली तरी तिने अनेकदा सक्षम असणाऱ्या खेळाडूंना आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले आहेय कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात तिने सक्षम गटात मोडणाऱ्या खेळाडूंसोबत स्पर्धा करताना अनेक पदके जिंकली आहेत.