पॅरिस पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताची पॅरा शूटर रुबिना फ्रान्सिस हिने देशासाठी आणखी एका पदकाची कमाई केली. महिला गटातील १० मीटर एअर पिस्टल SH 1 प्रकारात तिने कांस्य पदकाची कमाई केली. अंतिम फेरीत २११.१ गुणांसह ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली. रुबिना हिने पात्रता फेरीत ९०, ९०,९५, ९२, ९५९४ असे एकूण ५५६-१३x गुणांसह सहाव्या क्रमांकावर राहत अंतिम फेरी गाठली होती.
नेमबाजीतून चौथे अन् भारताच्या खात्यातील पाचवे पद
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजांनीच भारताच्या पदकाचे खाते उघडले होते. अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी १० मीटर अयर रायफल (एसएच1) प्रकारात भारताला अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई करून दिली होती. या दोघींना मिळालेल्या यशानंतर मनीष नरवाल यानेही रौप्य पदकासाठी निशाणा मारला. त्याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात पदकी निशाणा साधला होता. त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी रुबिना फ्रान्सिस हिने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. भारताच्या खात्यातील हे पाचवे पदक आहे. याशिवाय नेमबाजी क्रीडा प्रकारातील भारताचे हे चौथे पदक आहे. नेमबाजांशीवाय प्रीती पाल हिने मैदानी खेळात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
शारीरिक समस्येवर मात करून गाजवली जगातील मानाची स्पर्धा
१९९९ मध्ये मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे जन्मलेली रुबिना ४० टक्के दिव्यांग आहे. मोठ्या संघर्षातून तिने भारताच्या पॅरा शूटरच्या रुपात आपली ओळख निर्माण केली. रुबिना ही रिकेट्स या आजाराने ग्रस्त आहे. यामुळे हाडांच्या वाढीवर प्रभाव पडतो. पण शारीरिक समस्येवर मात करत तिने आपली ताकद ओळखून नेमबाजीत हात आजमावला. आता जगाच्या मानाच्या स्पर्धेत तिने देशाची मान उंचावत आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे.