Hokato Hotozhe Sema India’s Bronze Medal In Paris Paralympics 2024 :पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदक जिंकण्याचा धडाका कायम आहे. शुक्रवारी आर्मी मॅन होकातो होतोझे सेमा (Hokato Hotozhe Sema ) याने पुरुष गटातील गोळाफेकमधील एफ ४७ प्रकारात (Shot Put F47 Event) भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली.
लढवय्या फौजीचा चौथा प्रयत्न होता सर्वोत्तम, त्याच जोरावर तिसऱ्या स्थानावर पोहचत मिळवलं कांस्य
भारताच्या या लढवय्या माजी फौजीनं पहिल्या प्रयत्नान १३.८८ मीटर अंतरावर गोळा फेकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १४.०० मीटर, तिसऱ्या प्रयत्नात आणखी जोर लावून १४.४० मीटर, चौथ्या प्रयत्नात १४.६५ मीटर, पाचव्या प्रयत्नात १४.१५ मीटर आणि अखेरच्या प्रयत्नात १३.८० मीटर अंतरावर गोळा फेकला. चौथ्या प्रयत्नात पार केलेल्या अंतरामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यासह भारताच्या खात्यात २७ व्या पदकाची भर पडली.
इराणला 'गोल्ड' तर ब्राझीलला 'सिल्व्हर'
या क्रीडा प्रकारात सोमन राणाच्या रुपात आणखी एका भारतीयाचा समावेश होता. त्याला १४.०७ या सर्वोत्तम कामगिरीसह सातव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले. इराणच्या यासीन खोसरावी याने १५.९६ मीटर थ्रोसह गोल्ड तर ब्राझीलच्या पॉलिनो डॉस सँटोस याने १५.०६ मीटरसह रौप्य पदक पटकावले.
कोण आहे Hokato Hotozhe Sema ज्यानं देशाची वाढवली शान होकातो होतोझे सेमा हा भारतीय लष्करातील सैनिक आहे. २००२ मध्ये LOC वरील सैन्याच्या एका मोहिमेच्या दरम्यान भूसुरुंग (Land mine) स्फोटातील दुर्घटनेत या जवानाला मोठी दुखापत झाली. शस्त्रक्रिया करून डावा पाय काढावा लागला. यातून सावरण्यासाठी खूप वेळ गेला. पण या माणसानं हार मानली नाही. लष्कराच्या प्रशासकीय विभागात कार्यरत राहून आर्मी पॅरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून देशासाठी एक वेगळी इनिंग या आर्मी मॅननं सुरु केली. वयाच्या ३२ वर्षी गोळाफेक क्रीडा प्रकारात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर २०२३ मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक कमावले.