पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत मंगळवारी मध्य रात्रीनंतर निकाली लागलेल्या पुरुष गटातील उंची उडी T63 प्रकारात भारतीय खेळाडूंनी कमाल करून दाखवली. भारताच्या शरद कुमार (Sharad Kumar ) याने आपलाच सहकारी आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत विक्रमवीराला मागे टाकले.
भारताच्या भिडून मोडला आपल्याच सवंगड्याचा पॅरालिम्पिक रेकॉर्ड
मरियप्पन थंगावेलू (Mariyappan Thangavelu) याने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सेट केलेला १.८६ मीटर उंच उडीचा पॅरालिम्पिक रेकॉर्ड ब्रेक करत शरद कुमार याने रौप्य पदकाला गवसणी घातली. दुसरीकडे १.८५ मीटर उंच उडीसह मरियप्पन याला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. टोकियोमध्ये त्याने गोल्डन कामगिरी केली होती.
भारताच्या सुवर्णपदकाआड आला अमेरिकन
सुवर्ण पदकासाठी अमेरिकन ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट एझरा फ्रेच याने शरद कुमारसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. एका बाजूला शरद कुमार १.८८ मीटर उंच उडीसह दुसऱ्या क्रमांकावर असताना अमेरिकन खेळाडूनं १.९४ मीटर उंच उडीसह अव्वलस्थान भक्कम केले.
वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न केला, पण अमेरिकन खेळाडूला ते काही जमलं नाही
सुवर्ण पदक जवळपास निश्चित झाल्यावर या गड्यानं वर्ल्ड रेकॉर्ड १.९६ मीटरचा रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. यासाठी १.९८ मीटर उंच उडी मारण्याचे चॅलेंज त्याच्यासमोर होते. त्याचा हा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. पण वर्ल्ड रेकॉर्ड हुकला असला तरी तो भारताच्या सुवर्ण पदकाच्या आडवा मात्र आला. त्याने या गटात गोल्डन कामगिरीची नोंद केली.
भारताचा तिसरा गडी राहिला चौथ्या स्थानावर
पुरुष गटातील उंची उडी T63 प्रकारात भारतीय खेळाडूंनी कमाल करून दाखवली. या खेळ प्रकारात भारताकडून मरियप्पन थंगावेलू (Mariyappan Thangavelu), शरद कुमार (Sharad Kumar), आणि शैलेश कुमार (Shailesh Kumar)या तिकडीनं सहभाग घेतला होता. पण शैलेश कुमार १.८५ मीटर उंच उडीसह चौथ्या क्रमांकावर राहिला.