पॅरिस येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन क्रीडा प्रकारातही भारताचे मेडल पक्कं झालं आहे. पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार (Nitesh Kumar) याने बॅडमिंटन पुरुष एकेरी गटातील SL3 प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीतील ४८ मिनिटांच्या लढतीत त्यानं जपानच्या डीसूक फुजिहारा (Daisuke Fujihara) याला २१-१६, २१-१२ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत फायनल गाठली आहे. आता २ सप्टेंबरला तो सुवर्ण कामगिरी करण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरेल.
सुवर्णपदकासाठीची लढत कधी? कुणाविरुद्ध भिडणार नितीश कुमार
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन क्रीडा प्रकारातून फायनल गाठणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. सुवर्ण पदकासाठी त्याच्यासमोर आता ब्रिटेनच्या डॅनियेल बेथेल (Daniel Bethell) याचे आव्हान असेल. त्याला शह देत त्याने नवा इतिहास रचण्याची संधी त्याला आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रत्येक सामन्यात सोडली छाप
गतवर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत एसएल३ प्रकारच्या खेळात नितेश कुमारनं रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यामुळे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याच्याकडून पदकाची आस होती. साखळी फेरीतील प्रत्येक सामन्यात दमदार खेळासह विजयी सिलसिला कायम राखत त्याने पदकाची दावेदारी भक्कम केली होती. बाद फेरीतील लढतीतही हा धडाका कायम ठेवत त्याने फायनल गाठली आहे. आता इथंही विजयातील सातत्य कायम राखून त्याने गो फॉर गोल्डसाठी जोर लावावा, अशीच प्रत्येक भारतीयाची इच्छा असेल. तोही याच इराद्याने कोर्टवर उतरल्याचे पाहायला मिळेल.
अपघातात गमावला पाय, पण तरीही हरला नाही हिंमत
शरीराच्या खालचा भाग गंभीररित्या अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंचा Sl 3 प्रकारात समावेश केला जातो. भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मंडी (IIT Mandi) येथील पदवीधर आहे.२००९ मध्ये एका अपघातात त्याच्या पायाला कायमस्वरुपाची दुखापत झाली. पॅरा गेम्सच्या माध्यमातून या पठ्यानं आयुष्यातील संघर्षावर मात करण्याचा मार्ग निवडला. पॅरालिम्पिक स्पर्धेतील फायनलसह तो आता यशाच्या शिखरावर पोहचला आहे.
गत पॅरालिम्पिकमध्ये प्रमोद भगतनं जिंकलं होतं सुवर्ण
याआधी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत SL 3 प्रकारात प्रमोद भगत याने भारताला सुवर्ण क्षणाची अनुभूती दिली होती. पण यंदाच्या स्पर्धेआधी डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्यामुळे प्रमोद भगतवर बंदीची कारवाई झाली. हा भारतासाठी मोठा धक्का होता. पण नितीश कुमारनं या गटात पुन्हा एकदा सुवर्ण संधी निर्माण केली आहे.