पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकासह भारताचे खाते उघडणारी भारताची पॅरा गोल्डन गर्ल अवनी लेखरा (Avani Lekhara ) हिने आणखी एका फायनलमध्ये धडक मारली आहे. महिला गटातील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन SH1 प्रकारात ती पुन्हा पदकी निशाणा साधण्यासाठी सज्ज आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी हिने गोल्डसह ब्राँझ मेडल जिंकले होते. पुन्हा एकदा ती त्याच वाटेवरुन पुढे जाताना दिसत आहे.
पात्रता फेरीत सातव्या क्रमांकावर राहिली अवनी
५० मीटर रायफल थ्री पोझिशन SH1 प्रकारातील पात्रता फेरीतील अवनी लेखरा हिने ११५९-५९x गुणांसह सातव्या क्रमांकावर फिनिश करत फायनलमध्ये एन्ट्री मारली. याआधी अवनीनं महिला १० मीटर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले होते. टोकियो पॅरालिम्पिकनंतर सलग दुसऱ्यांदा गोल्डन कामगिरीसह तिने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.
मोना अग्रवाल शर्यतीतून आउट
पॅरा शूटिंगमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन SH1 प्रकारात अवनीशिवाय मोना अग्रवालही सहभागी झाली होती. पण तिला पात्रता फेरीत ११४७-३८x गुणांसह १३ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. मोना हिने याआधी अवनीसोबत कांस्य पदक जिंकले होते. पण यावेळी ती फायनल गाठू शकली नाही.
तिरंदाजीत पूजाची आगेकूच
अवनीशिवाय पॅरा तिरंदाजी क्रीडा प्रकारात पूजानं पुढच्या फेरीत प्रवेश करत भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. ती उपांत्य पूर्व सामन्यात बाजी मारून फायलन गाठत या क्रीडा प्रकारातून आणखी एक पदक निश्चित करणार का? ते पाहण्याजोगे असेल.