Paris Paralympics 2024 Preethi Pal clinches Bronze Medal At Women's 200m T3 : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पॅरालिम्पियन प्रीती पाल हिने कमालीच्या कामगिरीसह इतिहास रचला आहे. महिला गटातील २०० मीटर टी ३५ अंतिम फेरीत (Women's 200m T3 Final) ३०.०१ सेकंद अशी वेळ नोंदवत तिने तिसऱ्या क्रमांकासह कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
आधी १०० मीटर शर्यत जिंकली, मग २०० मीटरमध्येही कमी नाही पडली
पहिल्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धेत उतरणाऱ्या प्रीतीनं याआधी १०० मीटर टी ३५ प्रकारात कांस्य पदक कमावले होते. मैदानी खेळात भारताला पदक मिळवून देणाऱ्या या महिला धावपटूनं आता एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याचा महापराक्रम करुन दाखवला आहे.
नेमबाजांची चौकार; प्रीतीचा डबल धमाका! भारताच्या खात्यात जमा केले सहावे पदक
पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेतील दुसऱ्या पदकासह प्रीतीनं भारताच्या खात्यात सहाव्या पदकाची नोंद केली आहे. याआधी भारताकडून अवनी लेखरा (सुवर्ण) आणि मोना अग्रवाल (कांस्य) यांनी १० मीटर एअर रायफल (एसएच1) प्रकारात भारताला पदकाची कमाई करून दिली होती. त्यानंतर नेमबाज मनीष नरवाल याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात रौप्य पदकाला गवसणी घातली होती. रुबिना फ्रान्सिस हिने महिला गटातील १० मीटर एअर पिस्तूल एस एच १ प्रकारात कांस्य पदकी निशाणा साधला होता. नेमाजांच्या चार पदकासह प्रीतीनं एकटीनं १०० मीटरसह २०० मीटर शर्यतीत दोन पदके जिंकली आहेत.