भारतीय पॅरालिम्पियन आणि भालाफेकपटू सुमित अंतिल (Sumit Antil) याने नावाला अपेक्षित खेळ करत पॅरिस ऑलिम्पिकमध्येही गोल्डन कामगिरी करून दाखवली. पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत त्याच्याकडून सुवर्ण पदकाची आस होती. त्यानेही अजिबात निराश केलं नाही. पॅरिस येथील अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नातच त्याने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सेट केलेला आपलाच रेकॉर्ड मोडीत काढत यंदाच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची दावेदारी जळवास पक्की केली होती. त्याच्या याच प्रयत्नातून नव्या पॅरालिम्पिक रेकॉर्डसह त्याने भारतासाठी यंदाच्या स्पर्धेतील तिसरे सुवर्ण पटकावले.
भारतासाठी याआधी पॅरा नेमबाजी आणि पॅरा बॅडमिंटनमधून आलं होतं सुवर्ण
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात जमा झालेले हे तिसरे सुवर्ण पदक आहे. सर्वात आधी पॅरा नेमबाजीत अवनी लेखरा हिने भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर पॅरा बॅडमिंटनमध्ये नितेश कुमार या पॅराऑलिम्पियन खेळाडूनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती.
दुसऱ्या प्रयत्नातच मोडला टोकियोतील स्वत:चा ऑलिम्पिक रेकॉर्ड
पहिल्या प्रयत्नात ६९.११ मीटर भाला फेकल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ७०.५९ मीटर अंतरावर भाला फेकला. अन्य स्पर्धक त्याच्या आसपासही दिसत नव्हते. टोकियो नंतर पॅरिसमध्ये सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने सुवर्ण कामगिरी करत खास विक्रमासह इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकच नव्हे ऑलिम्पिकमध्येही पुरुष गटात अन्य कोणत्याही स्पर्धकाला सलग दोन वेळा गोल्ड मेडल जिंकता आलेले नाही. त्याच्याशिवाय या क्लबमध्ये भारताची पॅरा नेमबाजपटू अवनी लेखराचा समावेश होता. जिने बॅक टू बॅक पॅरालिम्पिक स्पर्धेत गोल्डन कामगिरी करून दाखवली आहे.
भालाफेकीतील वर्ल्ड रेकॉर्डही सुमितच्याच नावे
पुरुष भाला फेक F64 प्रकारातील वर्ल्ड रेकॉर्ड आणि पॅरालिम्पिक रेकॉर्ड दोन्ही भारताच्या गोल्डन बॉय सुमित अंतिलच्या नावे आहेत. हांगझोऊ येथे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याने ७३.२९ मीटरसह वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. त्याआधी २०२१ मध्ये टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ६८.५५ मीटर अंतरावर भालाफेकत त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. हा विक्रम मोडीत काढत पॅरिसमध्ये त्याने नवा पॅरालिम्पिक रेकॉर्ड सेट केल्याचे पाहायला मिळाले.
सुमितला तोड नव्हती; पण याच क्रीडा प्रकारात पदकाशिवाय संपला दोन अन्य भारतीयांचा प्रवास
सुमितच्या नंबर वन खेळीपुढे सारेस फीके ठरले. या क्रीडा प्रकारात श्रीलंकेच्या समिता दुलन कोडिथुवाक्कू याने ६७.०३ मीटर सह F44 प्रकारातील वर्ल्ड रेकॉर्डसह रौप्य पदक पटकावले. याशिवाय ऑस्ट्रेलियन मिचल बुरियन ६४.८९ मीटर भाला फेकत कांस्य पदकाला गवसणी घातली. मैदानी क्रीडा प्रकारात सुमित शिवाय भारताचे आणखी दोन पॅरा भालाफेकपटू या स्पर्धेत सहभागी होते. संदीप (F44) ६२.८० मीटर भाला फेकत चौथ्या क्रमांकावर राहिला. तर सारगर संदीप संजय याला (F44) ५८.०३ मीटरसह सातव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले.