Yogesh Kathuniya Win Silver In Paris Paralympics 2024 भारताचा पॅरालिम्पिक खेळाडू योगेश योगेश कथुनिया याने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला आणखी एक पदक मिळवून दिले आहे. पुरुष गटातील थाळी फेक F56 (Men's Discus Throw F56) क्रीडा प्रकारात त्याने रौप्य पदकाला गवसणी घातली. यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे रौप्य आहे. या पदकासह भारताच्या खात्यात आठव्या पदकाची भर पडली आहे.
पहिल्या प्रयत्नात निश्चित झाले पदक, उर्वरित प्रयत्नात सुवर्ण संधी हुकली
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारा हा भारतीय खेळाडू पदकाचा रंग बदलण्याच्या इराद्याने यावेळी मैदानात उतरला होता. ५० मीटर टार्गेट सेट केल्याची गोष्ट त्याने स्पर्धे आधी बोलूनही दाखवली होती. पण या टार्गेटपासून तो खूप लांब राहिला. योगेशनं पहिल्या प्रयत्नात ४२.२२ मीटर अंतर थाळी फेकली. यासह तो दुसऱ्या स्थानावरही पोहचला. पण त्यानंतर उर्वरीत प्रयत्नात ४१.५० मीटर, ४१.५५ मीटर, ४०.३३ मीटर, ४०.८९ मीटर आणि ३९.६८ मीटर अशी त्याची कामगिरी घसरत गेली. यावेळी 'मिशन ५० मीटर' चं टार्गेट फत्तेह झाले नसले तरी त्याचा पहिला प्रयत्न भारतासाठी पदक मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरला. सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये थाळी फेक प्रकारात रौप्य पदक मिळवण्याचा खास विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे.
ब्राझीलच्या खेळाडून वैयक्तिक रेकॉर्डस जिंकले गोल्ड
थाळी फेकमधील एफ ५६ प्रकारात ब्राझीलच्या क्लॉडिनी बटिस्टा याने अनुक्रमे ४४.७४ मीटर, ४६.४५ मीटर, ४५.४५ मीटर, ४५.८९ मीटर, ४६.८६ मीटर आणि ४५.५७ मीटर अशी कमगिरी नोंदवली. पाचव्या प्रयत्नात या खेळाडूनं ४६.८६ मीटरसह वैयक्तिक रेकॉर्डसह सुवर्ण पदकाची दावेदारी पक्की केली. याशिवाय ग्रीसच्या कोन्स्टँटईनोस झुनिस याने ४१.३२ मीटरसह कांस्य पदकावर नाव कोरले.