Paris Paralympics 2024 Medal Tally :पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत पाचव्या दिवशी वेगवेगळ्या खेळातील खेळाडूंनी नवा इतिहास रचला. पहिल्या चार दिवसाअखेर भारताच्या खात्यात जेवढी पदके जमा झाली होती त्यापेक्षा अधिक पदक पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी कमावली.
पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताचा खास विक्रम; एका दिवसात सर्वाधिक पदकांची कमाई
पॅरिसमध्ये मैदानी खेळासह बॅडमिंटन आणि तिरंदाजीमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंनी पाचव्या दिवसाच्या दैदिप्यमान कामगिरीसह नवा विक्रम प्रस्थापित केला. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत जे घडलं नव्हते ते पाहायला मिळाले. एका दिवसात भारताच्या खात्यात विक्रमी ८ पदके जमा झाली.
कोणत्या क्रीडा प्रकारात कुणी जिंकलं पदक? भारतीय पॅरालिम्पिक खेळाडू योगेश कथुनिया याने मैदानी खेळात पुरुष गटातील थाळी फेक (F65) प्रकारात रौप्य पदकासह भारताच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर बॅडमिंटनमध्ये नितेश कुमार याने पुरुष गटातील पॅरा बॅडमिंटन एकेरीतील SL3 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
पॅरा बॅडमिंटन महिला गटात थुलसिमति मुरुगेसन हिने महिला एकेरी गटातील SUV5 प्रकारात रौप्य पदक पटकावले. या क्रीडा प्रकारात मनिषा रामदासनं कांस्य पदकाची कमाई केली. या दोघींशिवाय सुहास याथिराज याने पुरुष एकेरीतील SL4 प्रकारात रौप्य पदक जिंकले. १७ वर्षीय शीतल देवीनं राकेश कुमार याच्या साथीनं तिरंदाजीतील संघिक क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. भारताच्या पाचव्या दिवसाचा शेवट गोल्डनं झाला. मैदानी क्रीडा स्पर्धेतील भालाफेक (F65) सुमित अंतिल याने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करुन दाखवली.
भारत कितव्या स्थानावर
पाचव्या दिवशी मिळाळेल्या घवघवीत यशानंतर भारताच्या खात्यात आता ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ कांस्य पदकासह एकूण १५ पदकं जमा झाली आहेत. पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदकतालिकेत भारत १५ व्या स्थानावर आहे.