Nitesh Kumar Gold Medal Paralympics: भारताचा पॅरा बॅडमिंटन स्टार नितेश कुमार याने पॅरिसमध्ये तिरंगा फडकवला आहे. पॅरा बॅडमिंटन एकेरीत SL3 क्रीडा प्रकारात त्याने ब्रिटनच्या डेनियल बेथेलचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा धुव्वा उडवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे दुसरे गोल्ड आहे. याआधी नेमबाजीत अनवी लेखरा हिने गोल्डन निशाणा साधला होता. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रमोद भगत (एसएल ३) आणि कृष्णा नागर (एसएच ६) यांनी सुवर्ण कामगिरी केली होती.
दोघांमधील फायनल खूपच रंगतदार झाली, निर्णायक सेटमध्ये भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूनं मारली बाजी
नितेश कुमार आणि डॅनियेल बेथेल यांच्यातील लढत अतिशय रंगतदार झाली. पहिल्या सेटमध्ये नितेशनं दमदार खेळ दाखवत सेट २१-१४ असा जिंकला. सर्वोत्तम बचाव आणि योग्य टायमिंगसह स्मॅश मारण्याचे कसब दाखवून देत नितेश कुमारन ब्रिटनच्य प्रतिस्पर्ध्याला बॅकफूटवर ढकलले. ब्रिटनच्या गड्यानं दुसऱ्या सेटमध्ये दमदार कमबॅक केले. नितेश या सेटमध्ये एकवेळी १८-१८ बरोबरीत होता. पण उर्वरीत तीन पाइंट्स घेत बेथेलनं हा सेट २१-१८ असा आपल्या नावे केला. निर्णायक सेटमध्ये २०-२० अशी रंगत पाहायला मिळाली. धैर्यानं खेळतं इथं नितेशनं बाजी मारली. पॅरालिम्पिकमधील पहिल मेडल तेही गोल्ड त्याने आपल्या नावे केले.
अपघातात पायाला गंभीर दुखापत, पण ...
मंडी IIT पदवीधर असणारा नितेश कुमार हा २००९ मध्ये एका अपघातात जखमी झाला होता. त्याच्या पायांना कायमस्वरुपीचे अपंगत्व आले. जीवन जगण्याचा स्वत:शी सुरु असलेला संघर्षाच्या पुढे जाऊन त्याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे.