- दिनेश गुंडअनपेक्षित निकालांनी गाजलेला सोमवारचा दिवस महाराष्ट्र केसरी गटासाठी सनसनाटी ठरला. हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांना वर्षभर केलेल्या तपश्चयेर्चे फळ मिळाले. त्यांच्या कष्टाला भाग्याची जोडही मिळाली.दुपारच्या सत्रात अनेक अनपेक्षित निकालांनी मैदान दणाणून गेले. गतवर्षाचा महाराष्ट्र केसरी किताब विजेता बाला रफीक शेख याला सोलापूरच्या माउली जमदाडेने हप्ते डावावर चितपट केल्यानंतर संपूर्ण मैदानात एकच जल्लोष झाला. या अनपेक्षित निकालाची चर्चा रंगत असतानाच गादी विभागातही धक्कादायक निकाल पाहण्यास मिळाला. पुणे शहराचा अभिजित कटके व नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यातील लढतही तुफान रंगली. पहिल्या फेरीत पिछाडीवर असलेल्या हर्षवर्धनने दुसऱ्या फेरीत वजनदार अभिजितविरुद्ध आक्रमक पावित्रा अवलंबत निर्णायक गुण वसूल केला. यानंतर त्याने कोणतीही कसर न दाखवताना आपण महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले.माती विभागातील अंतिम फेरीची लढत जणू काही सुग्रीव-वालींच्या लढतीसारखीच झाली. प्रारंभीच माती विभागात कधीही न पाहायला मिळणारा ग्रीको रामन प्रकारातील बॅक थ्रो शैलेश शेळकेने माउली जमदाडेला आपल्या हुकमी अस्त्रासारखा लावला आणि हजारो प्रेक्षकांची वाहवा मिळविली. परंतु, प्रचंड अनुभवाच्या जोरावर माउली जमदाडेने दुहेरी पट काढून ४ गुण वसूल करत लढतीत रोमांचकता निर्माण केली.अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत ज्ञानेश्वर जमदाडे जिंकतो आहे, असे वाटतानाच शेवटच्या १० सेकंदांत शैलेशने २ गुण मिळवून १०-१० अशी बरोबरी साधली आणि ५ गुणांच्या एकत्रित पकडीमुळे शैलेश माती विभागाचा विजेता ठरला. दोन्ही गटांतील निर्णायक लढतींचे विजेते तुल्यबळ आहेत. यामुळे बघू या, कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी? शैलेश की हर्षवर्धन, लातूर की नाशिक जिल्हा?
(आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच)