मुंबई : भारतीय शरीरसौष्ठव खेळातील सर्वात ग्लॅमरस स्पर्धा अशी ओळख असलेल्या तलवलकर क्लासिक स्पर्धेची रंगत २७ आणि २८ नोव्हेंबरला मुंबईत रंगेल. स्पर्धेची प्राथमिक फेरी जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगणार असून, अंतिम फेरी ऐतिहासिक षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे. विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ओळखल्या जाणा-या षण्मुखानंद सभागृहामध्ये पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेची रंगत पाहायला मिळणार आहे.इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर चमकलेले ३४ शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करणार असल्याने स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया आणि मिस्टर इंडिया या सारख्या मानाच्या स्पर्धेत पदक मिळवलेले दिग्गज खेळाडू एकाच मंचावर एकाच वेळी जेतेपद पटकवण्यास एकमेकांविरुद्ध तगडे आव्हान उभे करतील.एकूण तीन गटांमध्ये होत असलेल्या या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण मिश्र आणि तालबद्ध जोडी या गटाचे आहे. मिश्र गटामध्ये पुरुष व महिला शरीरसौष्ठवपटू जोडीने प्रदर्शन करतील. तर तालबद्ध गटामध्ये पुरुष - महिला जोडी ९० सेकंदाच्या वेळेत एका तालामध्ये प्रदर्शन करतील. याशिवाय वरिष्ठ पुरुष शरीरसौष्ठवपटू या मुख्य गटात जेतेपदाजी चुरस रंगेल. २९ नोव्हेंबरला षण्मुखानंद सभागृहामध्ये रंगणारी अंतिम फेरी अव्वल दहा खेळाडूंमध्ये रंगेल. या फेरीत स्थान मिळवण्यासाठी बलाढ्या महाराष्ट्रसह ओडिशा, दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे तगडे खेळाडू कडवी लढत देतील. तसेच सांघिक विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय रेल्वे, सेनादल आणि महाराष्ट्र यांच्यात मुख्य लढत असेल, अशी माहितीही स्पर्धा आयोजकांनी दिली.....................................बक्षिसांचा वर्षाव होणार...एकूण २० लाख रुपयांची रोख पारितोषिके असलेल्या या स्पर्धेत विजेत्या खेळाडूला ६ लाख रुपये रोख पटकावण्याची संधी असेल. तसेच अव्वल दहा खेळाडूंवरही रोख पारितोषिकांचा वर्षाव होणार असून उपविजेत्या खेळाडूला आणि तृतीय स्थानावरील खेळाडूला अनुक्रमे ३ लाख व ५० हजार रुपयांनी गौरविण्यात येईल......................................यांचे आहे आकर्षण...सलग दोनवेळा भारत श्री ठरलेला सुनीत जाधव, नुकताच मिस्टर वर्ल्ड स्पर्धेतील सुवर्ण विजेता महेंद्र चव्हाण, तीन वेळा मिस्टर आशिया ठरलेला बॉबी सिंग यांच्यासह राम निवास, सागर जाधव, अक्षय मोगरकर या अव्वल खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील.
शरीरसौष्ठवपटूंची क्लासिक स्पर्धा रंगणार, देशातील अव्वल 30 खेळाडूंचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 5:34 PM