- सीमा महांगडेमुंबई : गेल्या काही वर्षांत भारतीय क्रीडाक्षेत्राला प्रसिद्धी, पैसा, लोकप्रियता यांचे वलय लाभू लागले आहे. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत वर्चव गाजवणाऱ्या खेळाडूंना आर्थिक कमाईचे मार्ग उपलब्ध होऊ लागले. अशा वेळी खेळाडू उत्तेजक द्रव्ये चाचणीत दोषी आढळले तर त्यांचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे डोपिंग विरोधी जागरूकतेसाठी नाडा (नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ) आणि फजिकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या समन्वयाने मुंबई कालिना संकुलात एक दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याला देशभरातील खेळाडू, प्रशिक्षक, खेळसंस्था यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.मुंबई विद्यापीठात आयोजित या कार्यशाळेला २७० हुन अधिक सहभागी लाभले असून यामध्ये प्रशिक्षक यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. पदमश्री , खेलरत्न , अर्जुन पुरस्कार अशा विविध सन्मानाने पुरस्कृत धनराज पिल्ले या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू रवींद्र कुलकर्णी तर अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय एथलेटिक फेडरेशनचे सांख्यिकीशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिलेले रमेश खारकर यांची विशेष उपस्थिती या प्रशिक्षण कार्यशाळेला लाभली होती. यामध्ये रमेश खारकर यांचे अभिवादन करून त्यांचा सन्मानही करण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या फिजिकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या प्रमुख डॉ वासंती कधीरवन यांनी दिली.उत्तेजके घेऊन आपली कामगिरी अधिकाधिक उत्तम करण्याकडे वाढू लागलेला कल आणि हे केवळ वरिष्ठ गटातील खेळाडूंमध्येच नव्हे तर मोठ्या प्रमाणात ज्युनियर स्तरावरच्या खेळाडूंमध्येही ही कीड फोफावू लागली आहे. कमी कष्टात, कमी वेळेत आपला नसलेला दर्जा सिद्ध करण्यास या ज्युनियर खेळाडूंना प्रवृत्त केले जाऊ लागले आहे किंवा त्यांनाही हा मार्ग कळत नकळत प्रशस्त वाटतो मात्र हा अधोगतीचा हा शॉर्टकट आहे, असेही कधीरवन यांनी सांगितले. कोणत्याही स्तरावरील स्पर्धेदरम्यान अनेक मुलांकडे सापडलेल्या गोळ्या, सिरिंज, ऊर्जा देणारी पेये, क्रीम्स याबाबतची माहिती आणि जागरूकता या कार्यशाळेत करण्यात आली.निर्भेळ यश हे केवळ मेहनतीतून, गुणवत्तेतून प्राप्त करता येते. विजयाचा जल्लोष करतानाच पराजयही मोठ्या मनाने स्वीकारायला हवा, हे या खेळाडूंच्या मनावर बिंबवायला हवे.त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक , संघटनानी जबाबदारीने वागायला हवे- धनराज पिल्ले, माजी आॅलिम्पियन हॉकीपटू
विद्यापीठात नाडाकडून अँटी डोपिंगचे धडे, राष्ट्रीय कार्यशाळेत २७० खेळाडूंचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 5:37 AM