ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 31 - प्रो कबड्डीच्या चौथ्या सिझनमध्ये पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पँथर्सवर 8 गुणांनी विजय मिळवला आहे. हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम लढाईत पटना पायरेट्सने सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर हा विजय खेचून आणला. पटनाचा प्रदीप नरवाल विजयाचा शिल्पकार ठरला असून, प्रदीपने चढाईत एकूण 16 गुणांची कमाई करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जयपूरला स्वतःचा बचाव करताना नाकीनऊ आल्यानं या परिस्थितीचा उत्तम फायदा उचलत प्रदीपने 16 गुण मिळवले.
सामन्याच्या मध्यांतरापर्यंत पटना पायरेट्सला फक्त तीन गुण मिळवता आले होते. जयपूरकडे पुनरागमनाची चांगली संधी असतानाही पटनाने अखेरच्या सिझनमध्ये वर्चस्व कायम राखत जयपूरला पराभवाची धूळ चारली. पटनाने जयपूरवर 37-29 असा विजय मिळवला. या विजयामुळे पटना पायरेट्सचा हा सलग दुस-यांदा प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा विजेता ठरला.
याआधी पहिल्या उपांत्य फेरीतही पटना पाटरेट्सनं पुणेरी पलटनवर 37-33 असा विजय मिळवला होता. तर दुस-या उपांत्य फेरीत जयपूर पिंक पँथर्सनं तेलुगू टायटन्सचा 34-24 असा पराभव केला होता. पटना पायरेट्सनं सलग विजय मिळवल्यानं त्यांचा फायनल प्रवेश मिळाला. सिझनच्या शेवटच्या सामन्यापर्यंत 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून 52 गुण मिळवून पटना पायरेट्स आघाडीवर होती. धर्मराज चेरालथन यांच्या नेतृत्वाखाली पटना पायरेट्सनं चांगली कामगिरी केली आहे.