मुंबई : ‘महाविद्यालयीन स्तरावरील क्रीडा व्यवस्था अपेक्षेनुसार सुधारण्यात अद्याप आपल्याला यश आलेले नाही. यामुळे ज्युनिअर ते एलिट स्तरापर्यंत आपल्याला पुरेशी गुणवत्ता दिसून आली नाही,’ असे सांगतानाच भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने तीन वर्षात पुढील ऑलिम्पिक खेळणे कठीण ठरेल, असे मत व्यक्त केले.
एका क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या बिंद्राने म्हटले की, ‘टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरली. यामध्ये आपण आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७ पदके जिंकली. शानदार विजयांसोबतच काही निराशाजनक क्षणही आले. पण खेळामध्ये असे होतच असते. पुढील ऑलिम्पिक अधिक आव्हानात्मक ठरेल, कारण तयारीसाठी केवळ तीन वर्षांचा कालावधी आहे. साधारणपणे, ऑलिम्पिकनंतर खेळाडू एक वर्ष आराम करून तणाव घालवण्याचा प्रयत्न करतात. पण आता लगेच पुढील मोहिमेसाठी मैदानात यावे लागेल.’
- महाविद्यालयीन स्तरावर खेळांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे सांगताना बिंद्रा म्हणाला की, ‘देशभरात महाविद्यालयातील क्रीडा व्यवस्था अधिक सुधारावी लागेल. - अधिकाधिक स्पर्धात्मक उपक्रम राबवावे लागतील. योग्य व्यवस्थेच्या अभावामुळे आपण ज्युनियरपासून एलिट स्तरापर्यंतच्या अनेक गुणवत्तेला मुकलो आहोत.’