ऑनलाइन लोकमत -
बंगळुरु, दि. ११ - दुष्काळामुळे महाराष्ट्रात सामने खेळवण्यावरुन आयपीएलला विरोध होत असताना आता बंगळुरुतदेखील विरोध होऊ लागला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे आयपीएल सामने बंगळुरुत खेळवले जाऊ नये अशी मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आयपीएल सामने बंगळुरुबाहेर खेळवण्यात यावेत अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
वकील दिवाकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.दिवाकर यांनी 7 एप्रिललाच याचिका दाखल केली होती मात्र त्यात काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने न्यायालयाने नव्याने याचिका करण्यास सांगितलं होतं. तसंच याचिकेत आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांच्या नावाचा उल्लेखदेखील नव्हता त्यामुळे सुनावणी घेणं शक्य नसल्याचं सांगितलं होतं.
गेल्या आठवड्यात मुंबईत उच्च न्यायालयाने राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता आयपीएल राज्याबाहेर खेळवण्यात यावे असं सुचवलं होतं. न्यायालयाने वानखेडेवर होणा-या सलामीच्या सामन्याला परवानगी दिली असली तरी उर्वरित सामने खेळवायचे की नाही यावर 12 एप्रिलला सुनावणी होणार आहे.