रिओ : जलतरण कक्षावर अधिराज्य गाजविणारा अमेरिकेचा दिग्गज जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने मंगळवारी आॅलिम्पिकची आणखी दोन सुवर्णपदके पटकाविली. यासोबतच तो आॅलिम्पिकमध्ये २१ सुवर्णांसह एकूण २५ पदकांची कमाई करणारा खेळाडू बनला आहे.सोमवारी १९ वे सुवर्ण जिंकणाऱ्या मायकेलने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात द. आफ्रिकेचा चाद ले क्लोस याला मागे टाकून २० वे सुवर्ण मिळविले. विश्वविक्रमी फेल्प्सने एक मिनिट ५३.३६ सेकंदात हे अंतर कापले. जपान आणि हंगेरीच्या खेळाडूंना रौप्य, तसेच कांस्यवर समाधान मानावे लागले. ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात रिले संघात सहभागी असलेल्या फेल्प्सने रात्री उशिरा देशाला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले. ब्राझीलच्या उत्साही प्रेक्षकांपुढे विजेत्याच्या थाटात उतरलेल्या फेल्प्सने लोकांना टाळ्या वाजविण्यास भाग पाडले. रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णांची हॅट्ट्रिक साधल्यानंतर मिशन पूर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया पाचवे आॅलिम्पिक खेळणारा विश्वविक्रमी फेल्प्सने दिली. माझी जिद्द २०० मीटर बटरफ्लायचे सुवर्ण जिंकण्याची होती. यंदाचे आॅलिम्पिक माझ्यासाठी लोण्यासारखेच आहे. आॅलिम्पिकचा शेवट सुवर्णपदकासोबत करणे हीदेखील गर्वाची बाब आहे. मी कधीही असे बोललो नाही, पण आज सांगू शकतो, की स्पर्धेच्या दिवशी मला नमवू शकेल, असा कुणीही खेळाडू स्पर्धेत नव्हता, असे फेल्प्सने सांगितले. लंडन आॅलिम्पिकमध्ये द. आफ्रिकेचा चाद ले क्लोस याने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात फेल्प्सला सुवर्णपदकापासून वंचित ठेवले होते. त्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली, तेव्हा पराभवाचा वचपा काढू शकणार नाही, असे वाटले होते. नंतर आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची घोषणा करताच या प्रकारावर वर्चस्व गाजविण्याची ओढ निर्माण झाली होती. २०० मीटर बटरफ्लायचे सुवर्ण जिंकणे हे ध्येय त्याने पुढे ठेवले होते. दुसरीकडे आई-वडील दोघेही कर्करोगाशी लढा देत असताना क्लोसने पुन्हा एकदा २०० मीटरची अंतिम फेरी गाठली, पण यंदा तो चौथ्या स्थानावर घसरला.
फेल्प्सला २१वे सुवर्ण
By admin | Published: August 11, 2016 12:38 AM