क्रीडाविश्वात झपाट्याने प्रगती करत असलेल्या पिकलबॉल खेळाने भारतातही चांगलाच जम बसवला आहे. जवळपास प्रत्येक राज्यात खेळला जाणाऱ्या या खेळाचा महासंग्राम आता मुंबईत रंगणार आहे. गोरेगाव येथे २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा रंगणार असून, या स्पर्धेतून खेळाडूंना आपल्या जागतिक क्रमवारीत सुधारणा करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) मान्यतेने आणि प्रो वर्ल्ड टॅलेंट स्पोर्ट्सच्या वतीने बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे होत असलेल्या या स्पर्धेला जागतिक मानांकन ३ टायर दर्जा देण्यात आला आहे. याद्वारे खेळाडूंना आपले जागतिक क्रमवारीतील स्थान सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण गुणांची कमाई करता येईल. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा अपेक्षित असला, तरी त्यांना चीन, सिंगापूर, नेपाळ, यूएई, टांझानिया आणि पिकलबॉलचे जन्मदाते असलेल्या अमेरिकेतील खेळाडूंकडे तगडे आव्हान मिळेल.
एकूण सहा गटांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत पुरुष व महिला गटात सामने रंगतील. यामध्ये १६ वर्षांखालील १९ वर्षांखालील, ३५ वर्षांवरील, ५० वर्षांवरील, ६० वर्षांवरील व खुला गट अशा मुख्य सहा गटांत सामने रंगतील.
फूटपाथपासून घेतली भरारी
मुंबईकर सुनील वालावलकर यांनी अमेरिकेत पिकलबॉल खेळ पाहिल्यानंतर २००७ मध्ये हा खेळ भारतात आणला. त्यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना या खेळाची ओळख चक्क मुंबईतील फूटपाथ, पार्किंग एरिया व इतर मोकळ्या जागेमध्ये करून दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह २००८ ला एआयपीएची स्थापना केल्यानंतर २०१३ ला पहिल्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन केले. यानंतर हा खेळ देशभरात पोहोचला आणि आज या खेळाची दिमाखदार आंतरराष्ट्रीय स्पर्धा मुंबईत रंगणार आहे. वालावलकर तसेच एआयपीएचे विद्यमान अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जागतिक पिकलबॉलमधील सर्वोच्च मानली जाणारी ब्रेनब्रिज स्पर्धाही मुंबईत रंगली होती.