बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
बॉलीवूडमधल्या एखाद्या थरारपटात सुरुवातीपासूनच व्हिलनकडून सतत मार खात असलेल्या हिरोने अचानक पलटवार करावा आणि सिनेमाच्या कथानकास कलाटणी मिळण्यास सुरुवात व्हावी. तशी कलाटणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरू येथे सुरू असलेल्या दुस-या कसोटीला खेळाच्या तिसऱ्या दिवशी अशीच कलाटणी मिळाली आहे. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही यजमानांची घसरगुंडी उडणार असे वाटत असतानाच शेवटच्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या अभेद्य भागीदारीने भारतीय संघाला पुनरागमनाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले आहे.
उंबरठ्यावरच म्हणावे लागेल, कारण हा उंबरठा ओलांडून विजयाच्या दिशेने जाण्यासाठी भारतीय संघाला किमान अडीचशे ते तीनशे धावांच्या आघाडीचे माप पालथे घालावे लागणार आहे. ते माप ओलांडण्यासाठी सध्या खेळपट्टीवर उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला चौथ्या दिवशी उपाहारापर्यत खिंड लढवावी लागणार आहे. अनिश्चिततेचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये सर्वात धोकादायक बाब म्हणजे प्रतिस्पर्ध्याला गृहित धरणे. न्यूझीलंड, इंग्लंडला हरवल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच श्रीलंकेत सपाटून मार खाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला सहज गुंडाळू, असा विश्वास विराट कोहलीच्या भारतीय संघाला होता. पण ऑस्ट्रेलियन संघाने पुण्यात इंगा दाखवत विराटसेनेला जमिनीवर आणले होते.
पुण्यात धडा मिळाल्यानंतर भारतीय संघ आणि संघव्यवस्थापन चार गोष्टी शिकतील अशी अपेक्षा होती. पण भारतीय संघाचे येरे माझ्या मागल्या सुरूच राहिलॆ. परिणामी बंगळुरूमध्येही पुन्हा फिरकीचा आखाडा तयार करण्यात आला आणि त्यात पहिल्या डावात भारतीय संघच अडकला. भारतीय फलंदाज फिरकीसमोर चांगले खेळतात. हा आता इतिहास झाला आहे. उलट भारताच्या अश्विन आणि जडेजापेक्षा नॅथन लायन आणि स्टीव्ह ओकिफे या मालिकेत अधिक प्रभावी ठरले आहे. पण देर आए दुरुस्त आए या उक्तीप्रमाणे सोमवारी सकाळी रवींद्र जडेजाची फिरकी चालली आणि एकवेळ सव्वाशेची आघाडी घेणार असे वाटणारी ऑस्ट्रेलिय फलंदाजी 87 धावांच्या आघाडीवरच थांबली.
सामन्यात सगळंच निराशाजनक होत असताना जडेजाचे सहा बळी भारतीय संघाला आत्मविश्वाचा चार डोस पाजून गेले. त्याचा परिणाम फलंदाजीवर दिसला. मालिकेत आपल्यांदा पहिल्यांदाच बरी म्हणावी इतपत सलामी मिळाली. पण चांगला खेळत असलेला राहुल, कर्णधार विराट कोहली आणि प्रमोशनवर पाठवलेला रवींद्र जडेजा अशी मंडळी बाद झाल्यावर यजमान फलंदाज तिसऱ्या दिवशी संध्याकाळीच हरी ओम विठ्ठला म्हणतात की काय अशी भीती वाटू लागली होती. पण फलंदाजीचे तंत्र कोळून प्यायलेल्या पुजारा आणि रहाणेने ही नामुष्की टाळली. नजरेसमोर दिसत असलेला पराभव दृष्टीआड जाऊन भारतीय क्रिकेटप्रेमींना आता विजयाची स्वप्ने पडू लागली आहेत.
पुजारा आणि रहाणेने आपल्याला किमान तिथपर्यंत पोहोचवलंय. दोघांनीही पाचव्या गड्यासाठी सध्यातरी 93 धावांची अभेद्य भागीदारी रचलीय. योगायोगच सांगायचा तर द्रविड आणि लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या दोन ऐतिहासिक त्रिशतकी भागीदाऱ्या रचल्या होत्या त्या पाचव्या विकेसाठीच होत्या. आता रहाणे आणि पुजाराकडून त्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा नसली तरी संघाची आघाडी अडीचशेपर्यंत घेऊन जातील, भाबडी आशा आहेच. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना गृहित धरून चालणार नाही. तरी कुणी सांगावं उद्याचा दिवस पुजारा आणि रहाणेचा असावा, भारताची आघाडी अडीचशेचा टप्पा गाठेल, दुसऱ्या डावात अश्विन-जडेजा कमाल दाखवतील. मग विजयाची दिल्ली आपल्यासाठी दूर नसेल. फिरभी पिक्चर अभी बाकी है!!!