नोएडा: विद्युत प्रकाशझोतात गुलाबी चेंडूपुढे फलंदाजी करतेवेळी गुगली समजणे आणि चेंडूची सीम पाहणे फारच कठीण होऊन बसते, असे मत भारतीय कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने व्यक्त केले.दुलिप ट्रॉफी सामन्यात इंडिया ब्ल्यूकडून इंडिया ग्रीनविरुद्ध २८० चेंडूत १६६ धावांची दमदार खेळी करणारा पुजारा म्हणाला,‘मी आज दीर्घवेळ खेळपट्टीवर होतो. या दरम्यान गुलाबी चेंडूपुढे आलेल्या अडचणी प्रकर्षाने जाणवल्या. नवा चेंडू वेगवान येत असेल तर चेंडूचा वेध घेणे फारच कठीण असते. फिरकीपटूचा सामना करताना गुगली खेळतेवेळी चेंडूची सीम ओळखायला त्रास जाणवत होता’, असे तो म्हणाला.गुलाबी चेंडूचा वापर वन डे आणि कसोटी सामन्यात करण्याआधी बीसीसीआयने या चेंडूचा प्रयोग दुलिप करंडक सामन्यात करण्याचे ठरविले आहे. खेळाडूंच्या आणि अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर या चेंडूने खेळण्यास मान्यता द्यायची किंवा नाही याचा निर्णय होणार आहे. पुजाराने बराचवेळ खेळपट्टीवर घालविल्यानंतर अनुभव सांगितल्याने गुलाबी चेंडू भारतीय खेळाडूंच्या लवकर पचनी पडेल, असे दिसत नाही.पुजाराने आगामी न्यूझीलंडविरुद्ध मालिकेवर देखील मत मांडले. न्यूझीलंडची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली असल्याने त्यांच्याविरुद्ध सावध खेळावे लागेल, असे तो म्हणाला. भारतीय कसोटी संघात विशिष्ट स्थानावर फलंदाजी करण्यास आपले प्राधान्य नसल्याचेही तो म्हणाला.(वृत्तसंस्था)
रात्रीच्या उजेडात गुलाबी चेंडू खेळणे कठीण : पुजारा
By admin | Published: September 06, 2016 2:31 AM