पुणे : पुण्यात होणाऱ्या पहिल्यावहिल्या कसोटीत धावांचा पाऊस पडेल की गोलंदाज वर्चस्व गाजवतील, या प्रश्नाचे थेट उत्तर न देता ही खेळपट्टी क्रिकेटपे्रमींना खेळाचा आनंद देणारी असेल, असे मत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी व्यक्त केले. या मैदानावर प्रथमच होणारी ५ दिवसांची लढत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होत आहे. या सामन्यात खेळपट्टीचा स्वभाव हवामान कसे असेल, यावर अवलंबून आहे. या मैदानावर प्रत्येक मोसमात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ४ दिवसीय रणजी सामने झाले. मार्च-एप्रिलमध्ये आयपीएलचे सामने झाले. त्या वेळचे वातावरण आणि या कसोटीच्या काळातील वातावरण वेगळे असेल. ४ दिवसीय लढतींमध्ये चेंडू फारसा वळत नव्हता. वेगळ्या वातावरणात होणाऱ्या या ५ दिवसीय सामन्यासाठीच्या खेळपट्टीबाबत ठामपणे सांगता येणार नाही. पहिल्याच कसोटीत खेळपट्टी कशी वागते, हे पाहण्यास मीदेखील उत्सुक आहे, असे साळगावकर म्हणाले. खेळपट्टीच्या अंदाजाबाबत ठामपणे सांगितले नसले तरी, भारतीय संघाला मदत करणारी खेळपट्टी असावी, अशी सूचना करण्यात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. मागील महिन्यात याच मैदानावर भारत-इंग्लंड एकदिवसीय लढत झाली. यात धावांचा पाऊस पडला होता. ‘‘इंग्लंडविरुद्धच्या लढतीनंतर गेला महिनाभर आम्ही या खेळपट्टीसाठी मेहनत घेतली. टी-२० आणि एकदिवसीय प्रकारांचे निकाल खेळपट्टीपेक्षा बऱ्याच प्रमाणात खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असतात. कसोटी प्रकाराचे मात्र तसे नसते. कसोटीसाठी खेळपट्टी तयार करताना क्युरेटरचा कस लागतो. ५ दिवसांत सुमारे ३० तासांच्या खेळासाठी खेळपट्टी तयार करणे आव्हानात्मक असते. ही कसोटी ५ दिवस चालावी व क्रिकेटप्रेमींना चांगला निकाल मिळावा, अशी माझी अपेक्षा आहे,’’ असेही त्यांनी नमूद केले. (क्रीडा प्रतिनिधी)
खेळपट्टी क्रिकेटप्रेमींना खेळाचा आनंद देणार
By admin | Published: February 21, 2017 12:44 AM