- स्वदेश घाणेकरकबड्डी काय खेळतोस? हे कसले भिकेचे डोहाळे लागलेत? अभ्यासात लक्ष दे आणि चांगली नोकरी पकड. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांप्रमाणे 'त्याच्या' घरच्यांचीही तीच अपेक्षा. शेतीवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. त्यामुळेच आपल्या मुलानं चांगला अभ्यास करून खूप मोठं व्हावं हे आईवडिलांचे स्वप्न. शिवाय याच कबड्डीमुळे त्यांच्या नात्यातील एका कुटुंबावर कधीही न विसरणारा आघात केला. त्यामुळेच आपल्या एकुलत्याएक मुलाला कबड्डी खेळण्यापासून ते रोखायचे. पण, मुलानं जिद्द सोडली नाही आणि याच कबड्डीच्या जोरावर चांगली नोकरीही मिळवली अन् आता तर त्यानं 'प्रो' भरारीही घेतली आहे.
प्रो कबड्डी आता सातव्या मोसमात प्रवेश करत आहे आणि यंदा अनेक युवा खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहण्याची संधी दर्दी चाहत्यांना मिळणार आहे. याच युवा खेळाडूंमध्ये एक नाव सध्या चर्चेत आहे आणि ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील अमीर धुमाळ याचे. २८ वर्षीय अमीरचा जन्म शेतकरी कुटुंबातील. अमीरला कबड्डी खेळण्यास घरच्यांकडून विरोध होता. पण अमीरने जिद्द सोडली नाही आणि आज त्यानं प्रो कबड्डीतील बंगाल वॉरियर्स संघात प्रवेश केला.
साधारण १३-१४ वर्षांचा असताना अमीरने कबड्डी खेळायला सुरुवात केली. घरच्यांचा विरोध असतानाही तो कबड्डी खेळत राहिला. दिवसेंदिवस त्याची खेळातील होत असलेली प्रगती पाहूनही घरच्यांना एक चिंता सतावत होती. पण, कबड्डी क्षेत्रातील जाणकारांवर अमीरच्या खेळानं मोहिनी केली होतीच आणि त्यांनी अमीरच्या पालकांचे मन वळवले. "घरच्यांचा विरोध कायम होता. पण, मला कबड्डी काही सोडवतं नव्हती. सातत्यपूर्ण खेळ करत होतो. कबड्डीतल्या जाणकारांनी घरच्यांना माझ्या खेळाबद्दल सांगितले, त्यांचे मन वळविले. त्यानंतर मुंबईतील भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती झालो. तेथून महाराष्ट्र पोलीस कॅम्पमध्येही सहभाग घेतला. २०१३ मध्ये मध्य रेल्वेत रुजू झालो," असे अमीरने सांगितले.
पण, मध्य रेल्वेत अनेक दिग्गज कबड्डीपटू असल्याने अमीरला दोन वर्ष वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळालीच नव्हती. पण, २०१६ मध्ये त्याने आंतर विभागीय आणि अखिल भारतीय रेल्वे स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तत्पूर्वी २०१० मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील कांस्यपदक त्याच्या नावावर होते. ६६व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत राजगड जिल्ह्यानं अमीरच्या नेतृत्वाखाली जेतेपेद पटकावले. त्यानंतर आमीरसाठी प्रो कबड्डीचे दार उघडले.
ऱायगड ते प्रो कबड्डी या प्रवासाबद्दल अमीर सांगतो की," पहिल्या सीजनपासून प्रो कबड्डीत खेळण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण, तशी संधी मिळाली नाही. मध्ये रेल्वेत काम करत असतानाही जिल्ह्याच्या संघाने खेळण्याची संधी दिली. रायगड संघाचे नेतृत्व करताना जेतेपद पटकावले. या कामगिरीची दखल प्रो कबड्डीनं घेतली आणि बंगाल वॉरियर्स संघाने मला करारबद्ध केले." बंगाल वॉरियर्सने १० लाखांचा करार केला.
त्या एका प्रसंगामुळे होता घरच्यांचा विरोध..."कबड्डीमुळे माझ्या नात्यातील एका भावाला प्राण गमवावे लागले होते. आशिष ( बंड्या) धुमाळ असे त्याचे नाव होते. १३-१४ वर्षांचा असताना कबड्डी खेळताना त्याला मार लागला आणि त्याचा जीव गेला. या एका प्रसंगामुळे घरचे मला कबड्डीपासून दूर ठेवत होते. माझ्याबाबतीतही असं काही घडू नये हा त्यांचा हेतू होता. हे सर्व ते माझ्यावरील प्रेमापाईच करत होते. पण, मी खेळत राहिलो आणि आज माझ्या प्रगतीनं तेही समाधानी आहेत," असे अमीर म्हणाला.